मीच थांबलो नाही, त्यामुळे पीएम मोदींना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar on PM Modi Birthday Politics : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राजकारणात कटुता ठेवू नये, असा यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आपण जपत असल्याचं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली परखड मते मांडली.

पंतप्रधान मोदींवर शरद पवारांचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'अवतारपुरुष' म्हणणं मला समजत नाही, असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, "माझ्या ७५व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. त्यांनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही."
विशेष म्हणजे, "मी स्वतः थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना 75 नंतर थांबा, असं मी म्हणू शकत नाही," असं विधान करत पवारांनी एकाच वेळी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मिश्कील टिप्पणी केली.
देवाभाऊंनी दुष्काळ निवारणावर लक्ष द्यावे
राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर बोलताना शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'सोन्याच्या नांगरा'च्या कथेचा संदर्भ दिला. "शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगराचा वापर करून एक संदेश दिला होता. सध्या शेतीचं नुकसान झालंय. देवाभाऊंनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं," असा सल्ला त्यांनी दिला.
स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महाविकास आघाडी
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती सर्वत्र असेलच असं नाही, असं पवार म्हणाले. "काही ठिकाणी स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ.
काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू," असे संकेत त्यांनी दिले. ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांची ताकद वाढली तर ते चांगलंच आहे. मुंबई आणि ठाण्यात उद्धव ठाकरेंची ताकद मोठी असल्याने त्यांनी जास्त जागा मागण्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले.
हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षण
हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारं आहे, असं सांगत पवारांनी यावर सविस्तर भाष्य केले. "आपल्यातली एकीची वीण उसवू नये आणि कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा," असं त्यांनी सांगितलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य असल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली आहे. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या व्यापक भूमिकेचा आजही विचार करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ची वाट पाहतोय
निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवरून देशात मोठी नाराजी आहे. ३०० खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढला, ही लहान बाब नाही, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राहुल गांधींच्या आरोपांनंतरही आयोगाने खबरदारी घेतली नाही. "राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय," असं मिश्कील विधान करत त्यांनी आयोगाने आपली विश्वासार्हता वाढवावी, असं आवाहन केलं.












Click it and Unblock the Notifications