शरद पवारांची गुगली! तासांपुर्वीच भेटले अन् अतुल बेनके कोण ? विचारले
मुंबई - अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. एक तास होतो न होत की, माध्यमांच्या प्रश्नावर कोण अतुल बेनके असा प्रतिप्रश्न करत शरद पवार यांनी गुगली टाकली तेव्हा क्षणभर सर्वच अचंबित झाले.
अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज शरद पवार जुन्नर, आंबेगाव, खेडच्या दौऱ्यावर आहेत.या भेटीबाबत विचारले असता, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केले ते आमचे आहेत, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यामुळे अतुल बेनकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे काम केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या धर्तीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.
पवार म्हणाले बेनके कोणत्या पक्षात?
शरद पवार म्हणाले की, अतुल बेनके सध्या कोणत्या पक्षात आहेत मला माहिती नाही. पण, आम्हा दोघांत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचं काम केलं ते सगळे आमचेच आहेत असं माझं मत आहे. अतुल बेनके यांचे वडील वल्लभ शेठ बेनके माझे चांगले मित्र होते. अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे या भेटीत राजकारण आणू नका असे शरद पवार म्हणाले.
स्थिर सरकार देणार
शरद पवार म्हणाले, पुण्यात किती जागा मिळू शकतात, याबाबत आम्ही आताच काही बोलणार नाही. पण आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्यासाठी तीनही पक्ष एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे आम्हाला इतक्याच जागा द्या याच जागा द्या असे आम्ही करणार नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आम्ही तीनही पक्ष मिळून लढणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत आणि या राज्यात स्थिर सरकार आणणार आहोत. हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे, असेही शरद पवार म्हणाले.
महायुतीला जनतेने जागा दाखवली
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत.
दिलीप वळसेंना प्रश्न विचारा
शरद पवार म्हणाले, दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. ३५ वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना २५ वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications