मराठा - ओबीसी आरक्षण वादावर अखेर शरद पवारांनी मांडली भूमिका
छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकदेखील एकमेकांवर टीका टीप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत.
आरक्षणावरून सरकार केवळ ओबीसी आणि मराठा नेत्यांना झुलवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर विरोधकांनी आधी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि ओबीसी आंदोलकांबरोबर राज्य शासनाची कोणती चर्चा झाली? जरांगे-पाटील आणि ओबीसी समाजातील नेत्यांच्या उपोषणावेळी सरकारचे प्रतिनिधी त्यांना भेटले. पण त्यावेळी झालेली चर्चा अद्यापही लोकांसमोर आलेली नाही, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.
यावेळी शरद पवार यांना तुम्ही आरक्षणासाठी पुढाकार घेणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्याचे प्रमुख या प्रश्नावर मार्ग काढत आहेत. असं असताना त्यांना हातभार लावणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दिल्लीत जाऊन काही होणार नाही. प्रश्न इथला आहे. इथचं सोडवला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर गेल्यावरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जात आहे. तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर, 50 टक्क्याच्यावर आरक्षणाची मर्यादा न्यावी, अशी आमच्या बैठकीत आमच्या लोकांनी सूचना केली आहे. पण हा राज्याचा प्रश्न आहे. संसदेतील लोकांनी हा मुद्दा मान्य केला पाहिजे तरच त्यातून मार्ग निघेल. त्यावर अजून काही दिल्लीत चर्चा झालेली नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आज देशाची परिस्थिती बदलली आहे.
देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी निवडणुकीत काय बोलत होते? देशाची रक्षा त्यातून होत नाही. त्यांनी बंगळूरमध्ये सांगितलं आम्हाला 400 पार करायचे आहेत. त्यांना संविधान बदलायचं होतं. देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देतं. ते बदलणं लोकांना आवडलं नाही. यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लगावला.
राज्याचं एक वैशिष्ट्ये आहे. कुठे काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार आहेत,असं म्हटलं जातं. लातूरला भूकंप झाला तरी त्याला शरद पवारच जबाबदार आहेत अशी चर्चा त्याकाळी होती. तुम्हाला माहीत नसेल. पण तशी चर्चा होती. याबाबत सीनिअर लोकांना माहीत असेल, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी आज 27 जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पत्रकार परिषदेत केली.












Click it and Unblock the Notifications