राजकीय भूकंप: राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश; 'आप'चे दोनतृतीयांश राज्यसभा खासदारही सोबतीला
आम आदमी पार्टीचे (आप) ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का देत राघव चड्ढा यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, केवळ चड्ढाच नव्हे, तर राज्यसभेतील 'आप'च्या एकूण खासदारांपैकी दोनतृतीयांश खासदारही भाजपमध्ये विलीन होत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

केजरीवालांना मोठा धक्का
काही आठवड्यांपूर्वीच पक्षामध्ये पदोन्नतीऐवजी पदावनती (Demotion) झाल्यामुळे नाराज असलेले राघव चड्ढा आता भाजपची वाट धरत आहेत. त्यांच्यासोबत राज्यसभेतील दिग्गज चेहरे जसे की माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, अशोक मित्तल आणि संदीप पाठक हे देखील भाजपमध्ये सामील होत असल्याचे चड्ढा यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रामाणिक राजकारणापासून पक्ष दूर गेला - राघव चड्ढा
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चड्ढा भावूक झाले होते. ते म्हणाले, "ज्या 'आप'ला मी माझ्या आयुष्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता आपल्या मूळ तत्त्वांपासून आणि प्रामाणिक राजकारणापासून दूर गेला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या आश्वासनावर हा पक्ष सत्तेत आला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. त्यामुळे आता मी पक्षापासून दूर जाऊन जनतेच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला आहे."
राज्यसभेत 'आप'चे अस्तित्व धोक्यात?
राज्यसभेतील 'आप'च्या दोनतृतीयांश खासदारांनी पक्षांतर केल्यामुळे पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरभजन सिंग आणि स्वाती मालीवाल यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांनी साथ सोडल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
या मोठ्या राजकीय बदलामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार असून, आगामी काळात याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications