पडळकरांचं विधान; पवारांनी थेट फडणवीसांना फिरवला फोन, टप्प्यात कार्यक्रम होणार?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

पवारांनी फडणवीसांना सुनावले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. 'राजकारणात अशी गलिच्छ आणि वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारे नाही,' असे शरद पवार यांनी फडणवीस यांना सांगितले. पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करत यावर योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या फोन कॉलमुळे भाजप आणि महायुतीच्या नेतृत्वावर दबाव वाढला आहे.
पडळकर नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका केली होती. पडळकर म्हणाले होते, "जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला आपण किती बिनडोक आहोत हे तो सिद्ध करतो. गोपीचंद पडळकर हा जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही." या टीकेला त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव जोडत 'हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे,' असे आक्षेपार्ह विधान केले होते.
पडळकर यांनी आपल्या टीकेला कारण देताना म्हटले की, जयंत पाटलांनी त्यांना एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच त्यांनी वैयक्तिक टीका करत, 'माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मी जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. माझ्याकडे कार्यक्रम घेण्याची धमक आहे,' असेही म्हटले.
अजित पवारांची सावध भूमिका
या वादावर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी कोणाचेही नाव न घेता, 'महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राजकारणात एक सभ्यता राखली गेली आहे. त्यामुळे कोणीही असे वेदना देणारे वक्तव्य करू नये. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला, तरी समाजात सलोखा राहील याची काळजी घेतली पाहिजे,' असे म्हटले.
अजित पवार यांनी महायुतीमधील पक्षांच्या भूमिकेवरही स्पष्टीकरण दिले. 'वादग्रस्त विधानांबद्दल आमच्या महायुतीचे एक धोरण आहे. ज्या पक्षाच्या नेत्याने असे विधान केले आहे, त्या-त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घ्यावी. शिवसेनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे बोलतील, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल माझी जबाबदारी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे,' असे सांगत त्यांनी हा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे.
राजकीय वर्तुळात नाराजीचे वातावरण
पडळकरांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील घसरलेल्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे महायुतीचे नेते वारंवार राजकीय सभ्यतेचा आदर्श जपण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांचेच नेते अशाप्रकारची टीका करत आहेत. यामुळे महायुतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवारांच्या फोननंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पडळकरांवर काही कारवाई केली जाते की केवळ त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वैयक्तिक टीका आणि सुसंस्कृतपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.












Click it and Unblock the Notifications