Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ऐकायला येतोय तुतारीचाच गजर

मुंबई : गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची एकाछत्री घट्ट मांड ठोकून असणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे सचिन तेंडूलकर आहेत. सामना हातचा गेला आहे असे वाटत असताना मैदानावर पाय रोवून उभा राहून, प्रतिस्पर्ध्याच्या घशात गेलेला सामना सचिन जसा खेचून आणायचा, तशी हरलेली लढाई शरद पवार सहज जिंकून जातात. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी मैदान सोडायचे नाही, हा त्यांचा बाणा आबालवृद्धांच्या कौतुकाचा विषय आहे.

गेल्या 10 वर्षात राष्ट्रवादीतून अनेक नेते बाहेर पडले. ही तालेवार मंडळी होती. एखादा नेता अशा गळतीने गलितगात्र झाला असता. पण शरद पवारांनी नवी माणसे हेरली आणि त्यांना ताकद दिली. आरोग्याचे प्रश्न, वय विरोधात असताना स्वतः मैदानात उतरण्याचा पवारांचा गुण त्यांच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देत असतो. म्हणूनच अजित पवार यांच्यासारखा घरातला माणूस चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलेला असताना देखील पवार लोकसभेचे मैदान मारू शकले. 10 जागा लढवून 8 जागा जिंकणे हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे आणि त्यांनी तो दाखवून दिलाय.

Sharad Pawar

शांत आणि संयत भाषा, अफाट लोकसंपर्क, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची जाण, लोकमताची नाडी अचूक ओळखणे, शेतीबद्दल प्रेम, बुद्धीजीवी वर्गावर असलेला प्रभाव, विलक्षण संघटन कौशल्य, सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची वृत्ती, राजकीय परिस्थितीचे अचूक आकलन, गुणग्राहकता आणि नवे काहीतरी करून दाखवण्याची धमक हा सगळा गुणसमुच्चय पवारांच्या यशाचे गमक आहे.

महाराष्ट्राचे राजकारण आज शेतीभोवती फिरत असते. ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, फळबागा अशी पिके हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आधार आहे. आणि या विषयांची पवारांना विशेष रुची आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर या पिकांचा प्रभाव आहे. सध्या या वर्गात भाजप सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. आणि या क्षेत्रात कार्यरत असलेली माणसे आज शरद पवारांच्या सोबत आहेत.

लढवय्या वृत्तीचे महाराष्ट्राला विलक्षण आकर्षण आहे. झुंजणारा नेता महाराष्ट्राच्या जनतेला भावतो. तरुणांना त्याचे विलक्षण आकर्षण असते. केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची सुरु असलेली एकाधिकारशाही, या दोघांच्या सहमतीने महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली फाटाफूट, शरद पवारांच्या घरात पडलेली फुट, त्यातून एकाकी पडलेले पवार, केंद्रीय यंत्रणांच्या बेमुर्वत कारवाया यांच्याविरोधात ठाम उभे राहिलेले पवार, पावसात भिजून, बांधावर फिरून, कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे पवार महाराष्ट्राला आपले वाटतात. म्हणूनच उमेदवार कुणीही असला तरीही निवडणूक पवारांच्या लढवय्या वृत्तीच्या नावावरच होते. आणि म्हणूनच 84 वर्षाच्या या योध्यासोबत आज तरुणांचे मोहोळ दिसते आहे.

तरुण नेतृत्वाला संधी

शरद पवारांनी वेळोवेळी तरुण नेतृत्वाला जबाबदारी दिली. आज पन्नासी ओलांडलेले बहुतेक नेते 99 च्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री होते. आणि त्या नेत्यांनी महाराष्ट्र गाजवला. आता एक पिढी बदलल्यानंतर पवारांनी नव्या पिढीतील तरुणांना साद घातली आहे. निलेश लंके, रोहित पवार, रोहित पाटील, युगेन्द्र पवार, धैर्यशील मोहिते पाटील अशा तरुणांना शरद पवार ताकद देत आहेत. आणि हे तरुण शिलेदार देखील आपल्या नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवीत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात बोलबाला

पश्चिम महाराष्ट्राने शरद पवारांच्या राजकारणाला नेहमीच ताकद दिली आहे. आजही कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे या टापूवर शरद पवार यांचा वरचष्मा आहे. या पलीकडे बीड मधूनही पवारांना चांगले समर्थन मिळत आलेले आहे. इथे किमान 40 जागा जिंकण्याची शरद पवारांची ताकद आहे. इथली कारखानदारी, शेती, बाजार समित्या, फळबागा उत्पादन, बडे राजकारणी यांच्यावर शरद पवार यांचा जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे या भागात तुतारी विशेष प्रभाव दाखवील याबाबत राजकीय निरीक्षक निःशंक आहेत.

जातीची समीकरणेही शरद पवारांच्या बाजूने

महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण. या मुद्यावरून मराठा समाज मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात गेला आहे. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने समर्थन दिले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने धनगर समाजाला देखील पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याने नाराज झालेले धनगर समाजाचे नेते देखील पवारांच्या बाजूने गेले आहेत. राज्यात मोठ्या संख्येने असलेला मुस्लीम समाज तुतारीच्या चिन्हाखाली एकवटू लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या शहरी नेतृत्वाने ओबीसी, मागासवर्गीय वर्गात मोठा प्रभाव निर्माण केला आहे.

भौगोलिक, जातीय, शेतकी, औद्योगिक, धार्मिक समीकरणे यांचे मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या बाजूने ध्रुवीकरण होताना दिसत आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांची तुतारी जबरदस्त प्रभाव दाखवणार हे निश्चित आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+