"फडणवीसांच्या धमकीने झोप उडाली", शरद पवार असं का म्हणाले?
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महायुती सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याच्या अंमलबजावणीतून राज्याच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव या भागांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला तात्पुरता ब्रेक देण्यात आला होता.

निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गास पुन्हा गती देताना, मंगळवारी म्हणजेच 24 जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी ₹20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामुळे विरोधकांचा आक्रोश पुन्हा वाढला असून, काँग्रेससह अनेक पक्षांनी प्रकल्पावर टीकास्त्र सोडले आहे.
याच मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना इशारा देताना, "या विषयावर राजकारण करू नका, अन्यथा याद राखा," असा थेट इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपरोधिक टोला लगावत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
शरद पवारांचं उपरोधिक प्रत्युत्तर
शरद पवार म्हणाले, "शक्तीपीठ महामार्गाबाबत मला अधिक माहिती घ्यायची आहे. कोल्हापूरमधील लोकांशी संवाद साधून त्यांचे मत समजून घेणार आहे. सरकार आमच्यासमोर माहिती मांडण्यास तयार असेल, तर तीही समजून घेईन." याच दरम्यान, त्यांनी फडणवीसांच्या 'याद राखा' इशाऱ्याचा समाचार घेत, "फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे," अशा शब्दांत टोला लगावला. तसेच, "आता आमचं नेमकं काय होणार?" अशा शब्दांत त्यांनी पुढे मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली.
"मी विरोधासाठी विरोध करत नाही" - शरद पवार
पुढे बोलताना पवार म्हणाले, "कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी त्याची गरज आणि परिणाम समजून घेणं गरजेचं असतं. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात असतील, तर त्यांची बाजू ऐकणं आवश्यक आहे. तेथील लोकप्रतिनिधीही आपलं मत मांडत आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं गांभीर्याने ऐकलं पाहिजे."
"मी केवळ विरोध करण्यासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाही. सरकारने जर या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली, तर मी ती समजून घेण्यास तयार आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग जरी महत्त्वाकांक्षी असला, तरी त्याला स्थानिक स्तरावर मोठा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधक यांच्यात सुरु असलेल्या या शाब्दिक चकमकीमुळे आगामी राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications