सयाजी शिंदे तपोवन वृक्षतोडीविरोधात इरेला पेटले; सरकारला सुनावले खडेबोल! मुख्यमंत्र्यांवरही निशाणा!
Sayaji Shinde Condemns Tapovan Tree Cutting : अभिनेते आणि निष्ठावान पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर दिलेला भर आणि पर्यावरणवाद्यांवर साधलेला निशाणा या पार्श्वभूमीवर, सयाजी शिंदे यांनी गुरुवारी आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली. त्यांनी "साधू संतांना तरी तपोवनातील झाडे तोडणे चालेल का?" असा थेट सवाल विचारत वृक्षतोडीच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

'वृक्ष आपले आई-वडील': चुकीच्या कल्पनेवर प्रहार!
वृक्षतोडीच्या पर्यायी उपायांवर बोलताना सयाजी शिंदे यांनी प्रशासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 10 वर्षांच्या आतील झाडे तोडण्याची व त्या बदल्यात दुसरी झाडे लावण्याची कल्पनाच मुळात चुकीची आहे."
झाडांची तुलना मानवी जीवनाशी करत त्यांनी या कल्पनेची निरर्थकता स्पष्ट केली: "म्हणजे पोरांना मारायचे आणि आई-बापाला जिवंत ठेवायचे. प्रत्यक्षात त्यांचे उरलेले वय किती आहे? हे बघायचेच नाही. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी वृक्षांना 'आपले आई-वडील' मानले आहे.
"झाडे तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडे लावायची ही कल्पना मला पटत नाही. वृक्ष हे आपले आई-वडील आहेत. आपण जगतो ते केवळ झाडांमुळे. आपल्या आई-वडिलांवर कुणी हल्ला केला तर आपण गप्प बसणार का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे."
साधूसंतांना थेट आव्हान!
तपोवन हे साधूसंतांच्या तपश्चर्येचे आणि पवित्र भूमीचे प्रतीक आहे. याच भूमिकेतून सयाजी शिंदे यांनी सरकारला थेट आव्हान दिले: "आम्ही कोणत्याही साधूसंतांचा अवमान करू शकत नाही. पण अशी झाडे तोडणे हे साधूसंतांना तरी पटेल का? ऋषीमुनी झाडाखालीच बसून तपश्चर्या करत होते."
शिंदे यांच्या मते, झाडे तोडणे हे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांच्या विरोधातही आहे. या वेळी त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या टीकेवर बोलणे टाळले आणि 'आपल्यासाठी झाडे महत्त्वाची आहेत आणि ती जगली पाहिजेत' यावर भर दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका!
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट करत पर्यावरणवाद्यांवर निशाणा साधला होता.
कुंभमेळा आणि पर्यावरण
मुख्यमंत्री म्हणाले होते की, कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचवेळी पर्यावरण व झाडेही महत्त्वाची आहेत. त्यांच्या मते, कुणाचेही मत झाडे तोडण्याच्या बाजूने नाही. मुख्यमंत्र्यांनी "काही लोकांनी विनाकारण ॲक्टिव्हिझम सुरू केले आहे" असे सांगत या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. त्यांनी म्हटले, "मला पर्यावरणवाद्यांचा आदर आहे. पण काही लोकं राजकीय कारणांनी पर्यावरणवादी बनलेत."
तोडगा काढण्याचे आश्वासन
"कुंभमेळा हा निसर्गाशीच साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचे एक प्रतिक आहे. त्यामु्ळे यातून आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की, ज्यातून पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही." असे आश्वासन त्यांनी दिले होते. काही लोकांना कुंभमेळ्यात अडथळेच यावेत असे वाटते, मात्र सरकार अडथळे येऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.












Click it and Unblock the Notifications