दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना, सतेज पाटील कुणावर भडकले, कोल्हापुरच्या राजकारणात ट्विस्ट
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज ऐनवेळी मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच या ठिकाणी मैदानात राहिला नाही. या घटनेनंतर सतेज पाटील चांगलेच भडकले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात ते म्हणाले की, 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद', असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
ऐनवेळी मधुरिमाराजे यांची माघार
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेत कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घ्यायला नकार दिल्यानंतर मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी मात्र हा धक्का असल्याचं समजला जातोय.

काँग्रेसने उमेदवार बदलला
काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या नावाची पहिल्या यादीत घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या नावाला अनेक नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर मात्र काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता बदललेल्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील मात्र चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. तर मला तोडंघशी कशाला पाडले, असे देखील ते म्हणाले.
राजेश लाटकर यांना पाठिंबा
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनेच अर्ज मागे घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांनाच पाठिंबा द्यावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे.
मानसिक स्थिती बरोबर नाही
मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं ते म्हणाले. मधुरिमाराजेंनी माघार नेमकी का घेतली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
शाहू महाराज काय म्हणाले?
मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही."












Click it and Unblock the Notifications