'होय, आम्हीच देशमुखांचे अपहरण अन् हत्या केली', 3 आरोपींचा गुन्हा कबूल, वाल्मीक कराडचा पाय खोलात!
Santosh Deshmukh murder case, Beed Crime, Walmik Karad : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी व गॅंग लीडर सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घुले याच्यासह इतर तीन आरोपींनी देखील हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे.
वाल्मीक कराड यांनी सांगितल्यानंतर खंडणी मागण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली. यासंदर्भात एका मराठी वाहिणीने वृत्त प्रकाशित केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींनी कबुली जवाब दिल्याने आता वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.
कबुलीमुळे पोलिसांचा खटला अधिक मजबूत होणार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. या तिन्ही आरोपींनी दिलेली कबुली खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण आता यावरच पोलिसांतील खटला अधिक मजबूत होणार आहे.
आरोपींपैकी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिस चौकशीत आपला गुन्हा कबुल केलाय. आपणच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी दिली आहे.

नेमका काय म्हणाला घुले?
पोलिसांनी सुदर्शन घुले याला आवादा कंपनीमधील धमकी देत असतानाचा व्हिडिओ दाखवत प्रश्न विचारण्यास सुरवात केली. यावेळी होय आम्हीच अपहरण केले आणि आम्हीच हत्या केली अशी कबुली घुलेने दिली.
अवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मिळून मित्राचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली तसेच त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून हत्या केल्याची कबुली घुलेने दिली आहे.
तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत.
'देशमुखांच्या हत्येत वाल्मीक मास्टरमाईंड, घुले गँग लीडर'
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. सरकारी उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केल्याचे सीडीआरमधून समोर आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. त्यात वाल्मीक गाइड होता, तर सुदर्शन घुले गँगलीडर होता, असे ॲड. निकम यांनी न्यायालयासमोर सादर केले.
आधी खंडणी, नंतर मारहाण
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातसी आयडी व एसआयटीने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी आधी खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. नंतर संतोष देशमुख यांचा खून झाला, अशी मांडणी सीआयडीने दोषारोपपत्रात केली आहे.
त्यामुळे या प्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे दोषारोपत्र न करता, वाल्मीकसह 8 जणांविरोधात एकच दोषारोपत्र दाखल केले.
सरपंच देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन हत्या झाली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हा नोंद झाले होते. सुरुवातीला केज पोलिस व त्यानंतर सीआयडी, एसआयटीकडे तपास गेला होता.












Click it and Unblock the Notifications