सरपंच संतोष देशमुख प्रकरणी SPची बदली! 6 महिन्यात SIT चौकशी, कुटुंबियांना 10 लाखांची फडणवीसांकडून मदत
Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख प्रकरणी एसआयटी चौकशी आयजी लेव्हलचा अधिकारी तीन ते सहा महिन्यात पुर्ण करणार आहे तर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दहा लाखांची राज्य सरकार मदत करणार असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मास्टरमाईंड कुणीही असला तरीही कारवाई होणार मग वाल्मिक कराड का असेना...बीडमध्ये गुंडगिरी खपवू घेणार नाही. संबंधित प्रकरणात मकोका लावण्यात येणार आहे. आणि बीड जिल्ह्यात वाळू माफिया, गुंडाराज, उद्योगांना त्रास देणारे, भुमाफियाविरोधात मोहिम हातात घेऊन त्या सर्व लोकांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 6 डिसेंबर 2024 रोजी बाराच्या दरम्यान मसाजोग येथे अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे आरोपी त्या ठिकाणी गेले. त्यानंतर अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तेथील वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजीराव थोपटे यांनाही मारहाण केली.
cm फडणवीस म्हणाले, मारहाण चालू असताना थोपटे यांनी तेथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना काॅल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. हे घुले बाजुच्या गावचे आहेत त्यामुळे बाजुच्या गावचे लोक मारहाण करतात म्हटल्यावर साहाजिकच संतोष अण्णा तिथे आले. त्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली. देशमुख यांच्यासोबत अनेक लोक आले. बाहेरुन येत दादागिरी करत असतील तर त्यांना धडा शिकवायला हवा अशा हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला. घुलेंच्या दादागिरी आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 9 डिसेंबर 2024 ला संतोष अण्णा आपल्या वाहनातून गावी जात होते, त्यावेळी ते एकटेच होते. पंपावर ते थांबले तिथे त्यांचे आतेभाऊ होते ते त्यांना दिसले आणि अण्णांनी त्यांना बोलावले आणि सोबत चल म्हणाले. दोघे निघाले त्यावेळी टोलनाक्याजवळ काळ्या रंगाची स्काॅर्पिओ आणि इतर गाड्या वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांची गाडी वेगाने गेले तेव्हा वाट पाहणाऱ्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर अण्णांना बाहेर काढले आणि त्यांनी स्वतःच्या गाडीत टाकून मारहाण व नंतर अपहरण केले. तारा गुंडाळून मारहाण झाली. पाठीवर व्रणही दिसत आहेत. त्यावेळी असे लक्षात आले की, यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हल्लेखोर पळाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या दरम्यान अण्णांचा भाऊ विष्णू चाटेंच्या संपर्कात होता आणि त्यांनी भावाला सोडण्याची विनंती केली. हल्लेखोर सोडतो सोडतो म्हणत काही वेळही देत होते.अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू संतोष देशमुख यांचा झाला.
डोळे जाळले नाही प्रहार केले गेले
फडणवीसांनी स्पष्ट केले की, संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नसून त्यावर प्रहार करण्यात आले आहेत. काही प्रश्न उपस्थित झाले की, अॅट्राॅसिटी उशीरा का दाखल झाली. यावर फडणवीसांनी काही मुद्दे सांगितले ते असे..
6 तारखेची जी फिर्याद आहे ती प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली आणि त्यात स्वतःला मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे अॅट्राॅसीटी झाली नाही. त्यानंतर अॅट्राॅसीटी लागू करण्यात आली आहे.
29 नोव्हेंबर 2024 ला केज ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यात सुनील शिंदे यांना वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेंच्या मोबाईलवरुन धमकी दिली. तसेच सुदर्शन घुलेने कार्यालयात येत धमकावले असेही तक्रारीत नमूद असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेळोवेळी प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही गुन्ह्यांचा संबंध काय याची चौकशी आपण करत आहोत.
वाल्मिक कराड असला तरीही सोडणार नाही
गुन्ह्याचा मास्टरमाईंड कुणीही असला तरीही कारवाई होणारच. मग तो वाल्मिक कराड असला तरीही...एका गुन्ह्यात तो आहेच पण या गुन्ह्यातही तो असेल तर तो कुठल्या पक्षाचा आहे कुणासोबत संबंध आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी कालही बोललो की, बीड जिल्ह्यात अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. कुणावरही खुनाच्या प्रयत्नाचे आणि इतर गुन्हे लावण्याचे प्रकार घडत आहेत. मी याचा दोष पोलिस प्रशालनालाही देईल. यांच्यावर मकोका लावण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications