दिल्लीत महाराष्ट्राचा डंका: 'या' 7 खासदारांना 'संसद रत्न पुरस्कार' जाहीर; जाणून घ्या त्यांच्याविषयी
Sansad Ratna Award 2025 : लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. प्राइम फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये यंदा देशातील एकूण सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे, या मानकरींमध्ये महाराष्ट्रातील तब्बल सात खासदारांनी आपल्या कार्यक्षमतेची आणि कर्तृत्वाची चुणूक दाखवत हा बहुमान पटकावला आहे, ज्यामुळे दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

महाराष्ट्राच्या दिग्गजांचा गौरव
संसदीय कामकाजात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या या सात महाराष्ट्रीयन खासदारांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे, जे त्यांच्या पक्षाच्या आणि राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. या खासदारांची नावे खालीलप्रमाणे
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष)
आपल्या अभ्यासू वृत्तीसाठी आणि संसदेतील सक्रिय सहभागासाठी त्या नेहमीच ओळखल्या जातात. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत प्रभावीपणे आवाज उचलला आहे.
श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना)
पिंपरी-चिंचवडचे खासदार असलेले श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न आणि विकासाचे मुद्दे सातत्याने संसदेत मांडले आहेत.
स्मिता वाघ (भाजप)
भाजपच्या अनुभवी नेत्या असलेल्या स्मिता वाघ यांनी संसदीय कामकाजात आपले योगदान दिले आहे.
अरविंद सावंत (शिवसेना)
शिवसेनेच्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्यांपैकी एक असलेले अरविंद सावंत यांनी अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्द्यांवर संसदेत आपली भूमिका मांडली आहे.
नरेश म्हस्के (शिवसेना)
ठाण्याचे खासदार असलेले नरेश म्हस्के यांनीही संसदीय कामकाजात आपला ठसा उमटवला आहे.
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आणि अभ्यासू खासदार असलेल्या वर्षा गायकवाड यांनी विशेषतः शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर संसदेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
मेधा कुलकर्णी (भाजप)
पुणे जिल्ह्यातील खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांनीही संसदेतील आपल्या कामातून हा पुरस्कार मिळवला आहे.
दोन संसदीय समित्यांनाही मिळाला सन्मान!
या वर्षी दोन संसदीय स्थायी समित्यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यामध्ये
वित्तविषयक स्थायी समिती - अध्यक्ष : भर्तृहरी महताब
या समितीने संसदेत आर्थिक धोरणांवरील अनेक प्रभावी आणि व्यावहारिक अहवाल सादर केले आहेत.
कृषीविषयक स्थायी समिती - अध्यक्ष: चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस)
या समितीने संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी सुधारणांवर ठोस सूचना मांडल्या आहेत.
संसदरत्न पुरस्कार म्हणजे काय?
संसदरत्न पुरस्कार 2010 मध्ये सुरू करण्यात आला आणि पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी संसदेत सक्रिय राहणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. खासदारांना प्रोत्साहन देणे आणि लोकांमध्ये संसदीय कामकाज लोकप्रिय करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
संसदरत्न पुरस्काराचे महत्त्व
संसदरत्न पुरस्कार हा खासदारांच्या संसदीय कार्यक्षमतेचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या योगदानाचे मोजमाप करतो. प्रश्न विचारणे, चर्चेत भाग घेणे, विधेयकांवर सक्रिय सहभाग घेणे, खासगी विधेयक सादर करणे आणि मतदारसंघातील प्रश्न मांडणे यांसारख्या विविध निकषांवर खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.
हा पुरस्कार मिळणे हे त्या खासदाराच्या प्रभावी आणि जबाबदार संसदीय कामकाजाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्राच्या या सात खासदारांनी हा पुरस्कार पटकावून राज्याची मान उंचावली आहे. यामुळे इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात संसदीय कामकाजाचा दर्जा आणखी सुधारेल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications