'वन नेशन वन इलेक्शन'चे ढोल वाजवता, पण विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेटची 22 सप्टेंबरला होणारी निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आता यावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. 'वन नेशन वन इलेक्शन'चे ढोल वाजवतात, पण मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवरही हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यातील सर्वच्या सर्व जागा शिवसेना जिंकत आहे हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक रद्द केली. यांच्यात कोणत्याही निवडणुकांना सामोरी जाण्याची हिंमत नाही. जिथे पैशांची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात. पण या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदान करतात आणि आपल्या विद्यापीठाला दिशादर्शक असे काम करतो. ही निवडणूक आपण हरतोय हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली, असा घणाघात राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, जे कुबड्यांचे सरकार एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवतात, पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही. मला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदर कारभाराचेही आश्चर्य वाटते. ते लोकशाहीच्या मुद्द्यावर मोठमोठी भाषण करतात. निवडणूक आयोगाचा संबंध नसला तरी मुंबईत विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळाने दूध पितात का, हा आमचा सरळ प्रश्न आहे.
जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणुका घेण्याची तुमची हिंमत नाही
संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ज्या निवडणुका तुम्हाला पैशांच्या जोरावर जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करुन जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करुन तुम्ही जिंकू शकता या अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरे जाणार. पण जिथे लोकांची मतं विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणुका घेण्याची तुमची हिंमत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मग तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार? असा सवालही त्यांनी केला. या निवडणुका रद्द करुन त्यांनी संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला आहे. हा संताप ओढवून घेतला आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.












Click it and Unblock the Notifications