भारताची स्थिती बांगलादेशपेक्षा वेगळी नाही हुकूमशाहीला जनता माफ करत नाही- राऊतांचा मोदी सरकारला टोला
भारताची परिस्थिती काही बांगलादेशापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे हुकुमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.
बांगलादेशातील हिंसाचारानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. शेख हसीना या आश्रयासाठी भारतात आल्या आहेत, त्यावरून खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शन करत आलेल्या लोकांमध्ये आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये रविवारी 4 जुलै झालेल्या मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आंदोलनाला हिंसक वळण आल्यानंतर बांगदेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देश सोडला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, हिंदुस्थान सारखी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली होती. तिथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. निवडणूक घोटाळे झाले, विरोधकांना तुरुंगात डांबलं, विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या. हुकूमशाही पद्धतीने देश चालवला जात होता. आणि त्याचा अंत अशा पद्धतीने झाला आहे त्यामुळे भारतातल्या सध्याच्या राजकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
बांगलादेश प्रश्नी भूमिका स्पष्ट करावी
बांगलादेश हिंसाचारावरावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'पंतप्रधान संसदेत यायला तयार नाहीत. बांगलादेश पेटला आहे. त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं. बांगलादेश प्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात हुकुमशाही केली जाते. तिथे जनता त्यांना माफ करत नाही. एवढंच शेख हसीना यांच्याबाबत बोलता येईल'.
उद्धव ठाकरे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट
उद्धव ठाकरे पुढील तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. उद्धव ठाकरे यांचा पुढील 3 दिवस मुक्काम खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असणार आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ठाकरे पुढील 3 दिवस अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
संजय राऊत पुढे म्हणाले, 'आज उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचत आहेत. पुढील दोन दिवसात काही महत्वाच्या गाठीभेटी आहेत. आज काँग्रेसचे काही प्रमुख नेते त्यांना भेटायला येणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीतील मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे हे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच 8 तारखेला उपराष्ट्रपती यांनी त्यांना नाश्त्यासाठी बोलावलं आहे. ते तिकडे जातील, असे ते पुढे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका
प्रकाश आंबेडकर म्हणत असतील की शिंदेंची शिवसेना खरी आहे तर प्रकाश आंबेडकर यांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही जर म्हटलं रामदास आठवले यांचा पक्ष खरा आहे तर त्यांना किती वेदना होतील?असा टोला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.
मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले, लोकशाही आहे त्यामुळे त्यांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. त्यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला होता. आता ते कोणासोबत आहे हे शोधावे लागेल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी मनसेच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर दिली आहे.












Click it and Unblock the Notifications