बिफ कटलेट अन् दारुचं बिल, बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न, उत्तर द्यावेच लागेल - संजय राऊत
Sanjay Raut on Nagpur Hit And Run : नागपूरमध्ये झालेल्या हिट अॅंड रनमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत गाडी चालवत होता. अपघातानंतर दुसऱ्या व्यक्तीला चालक म्हणून दाखवले गेले आणि संकेतला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचलं.
फडणवीसांसारखा घटिया मुख्यमंत्री नाही
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एकीकडे आम्हाला हिंदूत्वाच्या गोष्टी सांगायच्या, श्रावण आहे, गणपती आहे, असा गाजावाजा करायचा. तर दुसरीकडे गोमांस खाऊन रस्त्यावर सर्वसामान्यांचे जीव घ्यायचे, हे राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सद्या धिंडवले काढले जात आहे. काळ्याकुट्ट अक्षरात ही घटना लिहिली जाईल.अशा प्रकारचा घटिया गृहमंत्री या राज्याला कधीही लाभला नाही, असे म्हणत खासदार राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निशाणा साधला. फडणवीस साहेब तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाने अनेक गाड्यांना चिरडून निष्पाप लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देत आहात. त्यामुळे हे पाप तुम्ही कुठे फेडाल? असा टोला देखील त्यांनी लगावला.

निष्पक्ष तपास होणारच नाही
संजय राऊत म्हणाले की, रस्त्यावर एखादा अपघात सामान्य माणसाने केला असता तर काय झालं असतं? एवढ्यात पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला, मित्राला रस्त्यावर बघून धिंड काढली असती. परंतु, सलमान खान सुटतो. एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो. कोणाचाही मुलगा असू दे, कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. कारची नोंदणी फक्त बावनकुळे यांच्या नावावर आहे. जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होऊ शकणार नाही.
भाजपला यावर उत्तर द्यावेच लागेल
राऊत यांनी पुढे बावनकुळे यांच्या मुलाच्या कारच्या अपघातावर देखील जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, दारूचं बिल आहे, नॉनव्हेज खाण्याचं बिल आहे, बिफ कटलेट खाण्याचं देखील बिल आहे. कोण काय खायला हवं हे मी सांगत नाही. बिफ खाण्यामुळे तुम्ही लोकांचे मॉब लिचिंग करता, मुस्लिमांचे लिचिंग करता. पण, तुमच्या बिलामध्ये बिफ कटलेचा उल्लेख आहे. याबाबत भाजपला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही सगळं करता आणि दुसऱ्यांचा जीव घेता, असे कसे चालेल.
सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक
संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येतात. राजकीय बैठका घेतात. निवडणुकीची तयारी करतात. आमच्यावर टीका करतात. पण मणिपूरवर कधी बोलणार?. तिथे कधी ॲक्शन घेणार, मणिपूर हातातून घालवायच आहे का? सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावे. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा. आता दोष द्यायला पंडित नेहरु नाहीत, तुम्ही 11 वर्षापासून सत्तेवर आहात.
बेईमानीच्या तराजूत शिंदे-पवार दोघेही समान
अजित पवार हे शिंदे पेक्षा वरिष्ठ नेते आहेत. हक्क तर त्यांचाच बनतो मुख्यमंत्री होण्याचा. अनुभवाच्या आधारावर आणि बेईमानी बघता शिंदे पेक्षा जास्त बेईमानी अजित पवार यांनी देखील केली आहे. बेईमानीचा जर तराजू बघता तर दोघे समान आहेत. अजित पवार यांना सर्वात जास्त हक्क आहे मुख्यमंत्री बनण्याचा, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.












Click it and Unblock the Notifications