थोडं थांबा, त्यांचेच लोक त्यांच्याच फाईल ओपन करतील; संजय राऊत यांचा महायुतीवर जोरदार निशाणा
राजा उत्सवात मग्न आहे तर रस्त्यावर खून पडत आहे, असं म्हणत आज शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. आज प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खा. राऊत यांनी महायुतीवर अनेक गंभीर आरोप केले. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या तंगड्या ओढत असून, एकमेकांविरोधात फाईल यायलाही सुरुवात झाली आहे. येत्या अधिवेशनातच त्यापैकी एखादा दुसऱ्याविरोधात बाँम्ब टाकू शकतो, असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला.

सद्यस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता
संजय राऊत म्हणाले, राज्यात रोज खून, दरोडे, बलात्कार होत आहेत. लूटमार सुरू आहे. मात्र राजा सध्या उत्सवात मग्न आहे. राज्याला गृहमंत्री नाही. आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री नाही. परिवहन मंत्री नाही त्यामुळे सगळा नंगानाच सुरु आहे. रस्त्यावर अपघात होत आहेत. हे कसलं राज्य आहे.. ? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्हाला तुमचे स्वत:चे मंत्री ठरवता येत नाहीत, यापेक्षा दुसरं दुर्देव नाही. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. तिकडे एकनाथ शिंदेंच्या लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्यातच ताळमेळ बसलेला नाही. अजित पवार स्वत:च गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या काराभारावर टीकास्त्र सोडले.
त्यांचेच नेते कुरापती बाहेर काढतील
बहुमत असलेलं सरकार राज्य चालवू शकत नसेल, तर या राज्याचं काय होणार.. ? अशी चिंता व्यक्त करत संजय राऊत म्हणाले, मंत्रीपदासाठी सध्या सगळ्याच पक्षात चढाओढ सुरु आहे. एकाला दिलं तर दुसरा नाराज होणार आहे. त्यांचेच लोक त्यांच्या फाईल जमा करत आहेत. आता त्याची सुरुवातही झाली आहे. हळूहळू एकेक प्रकरण समोर येत जाईल. कोणालाही मंत्री केलं तरी या तीन पक्षाचेच लोक एकमेकांविरोधात फाईल्स आणून देणार आहेत, याच अधिवेशनात एखादा स्फोट होऊ शकतो, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
आरोग्य खात्यावरही साधला निशणा
मराठवाड्यात डोळ्यांवर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना थंडीत कुडकुडत बसावं लागलं, याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, या राज्याला आरोग्यमंत्री कुठंय.. ? यापूर्वी जो आरोग्यमंत्री होता तोही भ्रष्ट्राचारी होता. निकाल लागून महिना उलटून गेल्यावरही खाते वाटप होत नसेल तर या सरकारला काय म्हणावं.. ? मलाईदार खात्यासाठी हे मंत्रीमंडळ रखडलंय. मात्र त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय हे त्यांच्या लक्षात येत नाही. कुणाला गृहखातं लागतंय, कुणाला अर्थखातं लागतंय, कुणाला नगरविकास खातं लागतंय, या राज्यात चाललंय काय.. ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications