"शिंदे गटाचा कोथळा अमित शाह काढणार!"; महिन्याभराच्या विश्रातीनंतर संजय राऊत कडाडले!
Sanjay Raut latest news : गेल्या महिनाभरापासून एका गंभीर आजारावर उपचार घेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजकीय वर्तुळात मोठे भाष्य केले. तब्येत सुधारत असल्याची माहिती देत त्यांनी शिंदे गट, भाजप यांच्यावर निशाणा साधत राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर देखील भाष्य केले.
आजारावर मात आणि 'डिसेम्बर'ची अपेक्षा
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली. "माझी तब्येत सुधारत आहे. उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर बारीक लक्ष आहे. आताही त्यांची परवानगी नाही, मात्र तुम्ही सर्व आलात म्हणून थोडं बोलतोय. तब्येतीत सुधारणा होतेय, अजूनही होईल. मला खात्री आहे की, डिसेम्बरनंतर मी पूर्ण बरा होईल. रिकव्हरी सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, "आजारापेक्षा उपचार कठोर असतात," या शब्दांत त्यांनी उपचारांची तीव्रताही स्पष्ट केली.

पालिका निवडणुका आणि 'लक्ष्मी दर्शन'
सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका/नगरपंचायत) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.
"नगरपालिका निवडणुका उद्या आहेत. शिंदे गँगच्या गुलाबरावांनी सांगितलंय की, लक्ष्मी दर्शन होणार. निवडणूक आयोगाने याची माहिती घ्यायला हवी," असे म्हणत त्यांनी पैशांच्या वापराकडे लक्ष वेधले.
सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यासंदर्भात बोलताना त्यांनी निवडणुकीतील बदललेल्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली."नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ कधीच झाला नव्हता. आता ५-६ हेलिकॉप्टर, खासगी विमान वापरत आहेत. सत्तेतल्या तीन पक्षांमध्ये (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) स्पर्धा आहे. इतके कोट्यवधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"कोथळा अमित शाह काढणार", शिंदे गटावर प्रहार!
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर सर्वात मोठा आणि थेट हल्ला चढवला. "शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार," असा मोठा दावा त्यांनी केला. "शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता."
फडणवीसांचे राजकारण
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, "फडणवीस यांचे राजकारण शिंदे यांना कळत नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही." त्यांनी शिंदेंच्या गटाला "अमित शाहांनी निर्माण केलेला गट" असे संबोधले.
ठाकरे बंधूंची एकजूट: महाराष्ट्राची गरज
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सकारात्मक आणि निर्णायक भाष्य केले. "शिवसेना आणि मनसे या दोघात सकारात्मक चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी भेट होत आहे." राज ठाकरे यांनी निवडणुकीसंदर्भात तयार केलेली पीपीटी उद्धव ठाकरे यांना आवडल्याची माहिती त्यांनी दिली.
त्रिकुटाला आव्हान
"मिस्टर शिंदे, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि गौतम अदानी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे जे प्रयत्न करत आहेत, ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही," असा हल्लबोल त्यांनी केला.
राज ठाकरे सोबत असणे ही मुंबईची गरज
राज ठाकरे सोबत आल्याने भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. "मुंबईचा शत्रू भारतीय जनता पक्ष आहे. गौतम अदानीला ज्या पद्धतीने मुंबई घशात घातली जात आहे, ती जर थांबवायची असेल तर राज ठाकरे यांचे सोबत असणे ही मुंबई आणि महाराष्ट्राची गरज आहे."
काँग्रेसबद्दल भूमिका!
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला सोबत घेण्याची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. बिहारच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल आणि ते मुंबईत स्वतंत्र लढायला तयार असतील तर त्यांना लढू द्या," असे ते म्हणाले. या विषयावर दिल्लीतील काँग्रेस हायकमांडशी आपण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications