"फडणवीस अर्धवट ज्ञानी, गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही!"; संजय राऊत मुख्यमंत्र्यांवर कडाडले, फार बुद्धी..
Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis : पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत भारताने सामना खेळण्यावरून सुरू असलेल्या वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठिणगी टाकली आहे. या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे.
फडणवीस यांनी 'जावेद मियाँदाद मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले होते,' अशी आठवण करून दिल्यानंतर राऊतांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

"फडणवीस अर्धवट ज्ञानी, गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही!"
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर 'अर्धवट ज्ञानी' असल्याची टीका केली. ते म्हणाले, "फडणवीस अर्धवट ज्ञानी आहेत. त्यांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही, भाजपवाल्यांना सुद्धा मेंदू नाही." मियाँदाद 'मातोश्री'वर आल्याच्या घटनेवर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, फडणवीसांनी 'ठाकरे' चित्रपट पाहिला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या तत्कालीन मुलाखती समजावून घेतल्या पाहिजेत.
राऊत यांनी घटनेची आठवण करून दिली
"जावेद मियाँदाद मातोश्रीवर बाळासाहेबांना भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका हे सांगण्यासाठी आला होता. मात्र, बाळासाहेबांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, 'चहा घ्या आणि निघून जा, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही.'"
राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधत म्हटले, "मिस्टर फडणवीस, मोदींप्रमाणे बाळासाहेबांनी शेपूट घातली नव्हती." तसेच, "जर तुम्हाला सिंदूरची कदर असेल, तर अशी विधाने करणार नाही," अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.
"पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली"
या वादंगादरम्यान संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला. ते म्हणाले, "तुम्ही फक्त एकच सांगा, पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही?"
राऊत म्हणाले, "तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे-नागडे दिसाल. पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली," अशा कठोर शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
मत चोरी करून मोदी सत्तेत आले
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी 'मत चोरी'च्या प्रश्नावरूनही केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार प्रहार केला. "ज्या लाडक्या बोगस बहिणींची मते विकत घेऊनच हे सरकार सत्तेत आले," अशी टीका त्यांनी केली. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी मतांचा प्रश्न उपस्थित केल्याचे राऊत म्हणाले. "हे (भाजप) बहिणींनी कौल दिल्याचे सांगत आहेत, पण हे मत चोरी करून सत्तेत आल्याचे मी सांगतो."
विविध देशातील उदाहरणासह मतचोरीवर भाष्य!
राऊतांनी या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्तराशी जोडले. त्यांनी म्हटले की, राहुल गांधींनी हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर घेतला असून, आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही गेला आहे. राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला की, त्यांनी निवडणुकीत युगांडामधील ईदी अमीन, इराकमधील सद्दाम हुसेन, पाकिस्तानमधील लष्करप्रमुख किंवा रशियातील पुतीन यांच्याप्रमाणे मत चोरी करून निवडणुका जिंकल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications