महाराष्ट्रात हनी ट्रॅपचा धुमाकूळ: संजय राऊतांचे फडणवीसांना 'फोटो-बॉम्ब'ने थेट आव्हान, नेमकं काय घडलं
Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात 'हनी ट्रॅप'ची चर्चा जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला सपशेल नकार दिला असला तरी, आज (21 जुलै) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करत फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. या नव्या ट्विस्टमुळे हनी ट्रॅपचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राऊतांचा गंभीर आरोप अन् फोटो बॉम्ब
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध, पाणी का पाणी होईल! 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत!"
शिवसेनेतून फुटलेले ४ खासदारही अडकलेत
संजय राऊत यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, "शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅपमुळे पळाले. या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हा फोटो प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजते. या हनी ट्रॅपची सूत्रे जामनेर, मुंबई, नाशिक आणि दिल्लीमधून हलली असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw
फडणवीस म्हणतात - 'ना हनी आहे ना ट्रॅप'
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी 'ना हनी आहे ना ट्रॅप' असे म्हणत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. नाना पटोले यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत 'बॉम्ब' आणल्याचे समजते, परंतु तो बॉम्ब गृहखात्यापर्यंत पोहोचवलाच नाही, असे फडणवीस म्हणाले होते. कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
गेल्या आठवडाभरापासून राज्यात 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा सुरू आहे. या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याचीही कुजबूज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत हे उत्तर दिले होते. त्यावरही राऊत यांनी निशाणा साधला आहे, ते म्हणतात की, विधानसभेत खोटे बोलणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव कायम आहे.
राजकीय भूकंपाची शक्यता?
संजय राऊत यांनी ट्विट केलेला फोटो आणि केलेले गंभीर आरोप यामुळे हनी ट्रॅप प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या फोटोची सीबीआय चौकशीची मागणी आणि शिवसेनेतून फुटलेल्या खासदारांना या ट्रॅपशी जोडल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरू शकते का, आणि या प्रकरणातून आणखी काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications