कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणारे कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची जहरी टीका; म्हणाले- जरा जपून
Rohit Pawar and Sanjay Raut Attck on Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केला जात आहे. यादरम्यान कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकर्यांना सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोकाटे यांचा शेतकर्यांबरोबरच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कोकाटे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
याबरोबरच कोकाटेंवर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार हल्लाबोल चढवला.

काय म्हणाले रोहित पवार, वाचा त्यांची पोस्ट
"कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही," अशी बोचरी टीका रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये केली आहे.
"रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून..." असा इशाराही रोहित पवारांनी कोकाटे यांना दिला आहे.
संजय राऊतांनीही लगावला टोला- कोकाटे म्हणजे राजकारणातले कामरा
संजय राऊत म्हणाले की, माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. ते अशी विधानं का करत आहेत? अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. सध्या त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल त्यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची… pic.twitter.com/nAzmkbI70o
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 5, 2025
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की कर्जमाफी होऊ शकत नाही? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता.
या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही."
पुढे कोकाटे म्हणाले की, "मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकर्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे.
सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा", असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं












Click it and Unblock the Notifications