Sanjay Raut : 'धुकं नव्हतं तर धोका होता!' अजित पवारांचा मृत्यू की घातपात? राऊतांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक नवे आणि अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत अत्यंत संशयास्पद दावे केले असून, थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

"१० दिवसांत खेळ खल्लास?" राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणातील 'टायमिंग'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊत म्हणाले की, "अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्यांची फाईल आहे आणि ती मी योग्य वेळी उघड करेन. त्यांनी १५ जानेवारी रोजी हे विधान केले आणि त्यानंतर अवघ्या १० दिवसांत त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे केवळ योगायोग असू शकत नाही, हे अत्यंत रहस्यमय आहे." राऊत यांनी या घटनेची तुलना थेट 'जस्टिस लोया' प्रकरणाशी करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
"पाच मृतदेह सापडले, सहावा कुठे?"
अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा पुनरुच्चार करत राऊत यांनी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातून सहा जण प्रवास करत होते, मग शोधमोहिमेत केवळ पाचच मृतदेह कसे सापडले? सहाव्या व्यक्तीचे काय झाले?
कागदपत्रे कशी वाचली?
जर भीषण आगीत मानवी देह ओळखीपलीकडे जळून खाक झाले होते, तर अजित पवारांच्या जवळील कागदपत्रे कशी काय सुरक्षित राहिली?
भ्रष्टाचाराची फाईल?
"दादा मुंबईतून भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल बारामतीला सुरक्षित ठिकाणी न्यायला निघाले होते का?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
"अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नव्हता"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, अजित पवार विलीनीकरणाची चर्चा फडणवीसांना विचारल्याशिवाय करतील, हे पटण्यासारखे नाही. "जर दादांनी फडणवीसांशी चर्चा केली नसेल, तर याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नव्हता. आज दादा आपल्यात नाहीत, याचा अर्थ त्यांच्या नावावर हवी ती 'बिले' फाडणे चुकीचे आहे," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
अस्मितेचा पक्ष भाजपने गिळला!
अजित पवारांच्या पक्षाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अजित पवारांचा मूळ पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहऱ्यांचा आणि प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष होता. मात्र, भाजपने ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून त्यांना स्वतःकडे खेचले. "सुरुवातीला तो शाहांचा पक्ष झाला आणि आता तो गोयल, पटेल, पारेख यांचा पक्ष होतोय. महाराष्ट्राची अस्मिता भाजपने गिळून टाकली आहे," असा घणाघात त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications