‘फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत', 'या' नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
वरळीतील विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट करत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यामागे फडणवीस यांचा हात आहे.

आज (५ जुलै) मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा मेळावा वरळीच्या एनएससीआय डोममध्ये पार पडत आहे. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राजकीय वातावरण अधिकच तापवले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "फडणवीसच शिंदेंना वारंवार अशा भूमिकांमध्ये ढकलत आहेत. त्यांना मुद्दाम अडचणीत आणलं जात आहे."
"आमच्या विधायक गुंडगिरीमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात"
मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्यावर मराठीच्या मुद्यावरून केलेल्या मारहाणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी "भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही" असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या मराठीसाठीच्या लढ्यामुळेच आज मुंबईत मराठी माणूस उभा आहे. त्या लढ्याला तुमच्या भाषेत 'गुंडगिरी' म्हटलं जातं, तर लक्षात ठेवा - आमच्या त्या विधायक गुंडगिरीमुळेच तुम्ही आज मुख्यमंत्री आहात."
शिंदेंच्या 'जय गुजरात' घोषणेवर टोला
एकनाथ शिंदे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात 'जय महाराष्ट्र'नंतर 'जय गुजरात' अशी घोषणा दिली होती. यावर राऊतांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "बडोदा हे गायकवाडांचं राज्य होतं, इंदूर आणि ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंद्यांचं क्षेत्र होतं. तरीही पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह कधी तिथे जाऊन 'जय महाराष्ट्र' म्हणाले का? योगी आदित्यनाथ यांनी कधी महाराष्ट्राच्या सत्ताधारी इतिहासाचा उल्लेख केला का? मग महाराष्ट्राच्या भूमीवर 'जय गुजरात' म्हणायचं काय कारण?"
राऊतांनी यावेळी आपल्या इतिहासाची जाण दाखवत फडणवीसांना सूचक टोला मारला, "मलाही इतिहास माहिती आहे, तुमच्याहून अधिक."
राजकीय भूमिका ठरवणारे फडणवीसच - राऊतांचा आरोप
राऊतांनी म्हटलं, "शिंदेंनी सारवासारव करू नये. महाराष्ट्राचा अपमान करू नये. प्रत्यक्षात फडणवीसच त्यांना अशा भूमिकांसाठी प्रवृत्त करत आहेत. शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक अशा विधानं करून घेतली जात आहेत. हे त्यांना अडचणीत टाकण्याचं राजकारण आहे."
काल झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने खुलासा करत 'गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे' असे वक्तव्य केले होते. तसेच, 'गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचललेला आहे' असंही म्हटलं होतं. मात्र राऊतांनी या सगळ्या भूमिकेवर आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण घटनाक्रम फडणवीसांच्या रणनीतीचा भाग असल्याचा पुनरुच्चार केला.












Click it and Unblock the Notifications