...म्हणून उद्धव ठाकरेंचा जळफळाट! मलिद्यासाठी धारावी मुद्दा काढला, या नेत्याचा मोठा आरोप
मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ आली असून या धर्तीवर आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योजक अदानी यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडून आता उद्धव ठाकरे यांच्यावरही मुंबईतील एका महत्वाच्या नेत्याने शाब्दीक तोफ डागली.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उठाठेव सुरु असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.

काय म्हणाले संजय निरुपम?
संजय निरुपम म्हणाले, जानेवारी २०१९ मध्ये महायुतीचे सरकार असताना धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातील अदानींचे टेंडर मागे पडून सेकलींक कंपनीला टेंडर मिळालं होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सेकलींकने यातून माघार घेतली होती. २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सेकलिंकचे टेंडर रद्द केले होते आणि अदानींना वाट मोकळी करून दिली होती.
कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला होता याचेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे. शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांचे सलोख्याचे संबंध संबंध भारताला माहित आहेत, त्यांचा तुमच्यावर दबाव होता का, असा प्रश्न निरुपम यांनी विचारला.
.. म्हणून ठाकरेंचा जळफळाट
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासंदर्भात टेंडर मसुदा मविआप्रमाणेच कायम ठेवला त्यात काहीही वेगळे नियम लावण्यात आले नाहीत. अटी व शर्ती त्याच आहेत, मग विरोध का? उबाठा आता केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी पालुपद लावत आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. धारावीतल्या झोपडीधारकांच्या भल्यासाठीच पात्र आणि अपात्र लोकांना सरसकट घरे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जळफळाट झाला.
गेले 6 महिने उद्धवजी गप्प का?
ठाकरेंच्या पक्षाने डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात आंदोलन केले होते. त्यानंतर आता जुलै महिन्यात उद्धव ठाकरे पुन्हा हा विषय उचलून धरत आहे. गेले सहा महिने उद्धवजी का गप्प होते? आता पुन्हा निवडणुकीकरिता देणग्या मिळवण्यासाठी तुमची उठाठेव चालली आहे का? अशी टीका निरुपम यांनी केली.
ठाकरेंनी हा केला होता आरोप
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत धारावी प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच उद्योजक अदानींवर टीका केली होती. ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि शहा यांचा मुंबईला अदानी सिटी करण्याच डाव आहे. ते धारावी अदानींच्या घशात घालत असून ते नागरी संतूलन बिघडवत आहे. मुंबईला लुटायचे कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही.
ठाकरेंनी आरोप केला होता की, अदानींना वारेमाफ एफएसआय दिला जात आहे. धारावीचा प्रकल्प अदानींना देत सरकार त्यांच्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा अधिगृहीत करुन त्यांना देत आहे हा प्रकार काय आहे. पात्र-अपात्रेतेचा कट करीत धारावीची जागा मिळवायचा सरकारचा कट आहे.
धारावीच्या झोपडपट्टीधारकांना पात्र-अपात्र कशाच्या आधारावर ठरवत आहात असा सवाल करीत सरकार फसवणूक करीत आहे. हे टेंडर रद्द होऊ शकते. अदानीसाठी मुंबईची विल्हेवाट लावणार असाल तर ते टेंडर रद्द करा. अदानींनीही हे टेंडर सोडून द्यावे पुन्हा टेंडर काढा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.












Click it and Unblock the Notifications