काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का ! हजारो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्याचा भाजपमध्ये होणार प्रवेश
पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा हादरा बसणार आहे. पुरंदर-हवेली मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. खुद्द जगताप यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

आज सासवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना संजय जगताप म्हणाले, "आम्ही भाजपसोबत बिनहुंड्याचं लग्न केलं आहे." यात आपला कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय जगताप नेमकं काय म्हणाले?
संजय जगताप यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सासवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते म्हणाले, "भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. माझा यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही."
कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचार न केल्यामुळे संजय जगताप यांच्या पराभवात आघाडीचा मोठा वाटा होता, असा प्रश्न विचारला असता, जगताप यांनी "आघाडीने कायमच आम्हाला डोक्यावर आपटले आहे," असे उत्तर दिले. तसेच, त्यांनी काँग्रेसला संघटनात्मक शिस्त लावण्याचा सल्लाही दिला.
भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का का?
संजय जगताप यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच त्यांचे निकटवर्तीय आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुरंदर-हवेली परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही सत्तेच्या जवळ जाण्याची इच्छा वाढली आहे.
"सत्तेशिवाय शहाणपण नाही" या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. जगताप यांची संघटना मजबूत आहे, त्यांचा विविध सामाजिक संस्थांवर प्रभाव आहे आणि त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. यामुळे भाजपला त्यांचा प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. भाजपच्या प्रदेश नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
आरएसएससोबतचे संबंध आणि आगामी राजकीय समीकरणे
संजय जगताप यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला संघाचा विरोध असण्याची शक्यता कमी आहे. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या कारणांमुळे हे संबंध ताणले गेले असले, तरी आता नवीन राजकीय समीकरणात ते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे.
आगामी काळात संजय जगताप कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात.












Click it and Unblock the Notifications