विधानसभेपूर्वीच राज्यात नव्या पक्षाचा उदय,'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष'ची निवडणूक आयोगाकडून मान्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली आहे.
इतकेच नाही तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला आता निवडणूक आयोगाच्या वतीने पक्षाचे चिन्ह देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राज्यातील जनतेसाठी ही आनंदाची वार्ता असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या माध्यमातून राज्यात तिसऱ्या आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ते करत आहेत. त्यात आता संभाजीराजे यांच्या पक्षाला स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता देखील दिली आहे.
आनंदवार्ता…!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,
दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ
संभाजीराजे यांनी केलेली पोस्ट देखील वाचा....
आनंदवार्ता...!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,
दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली "स्वराज्य संघटना" आता भारतीय निवडणूक आयोगाकडे "महाराष्ट्र स्वराज्य पक्ष" या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून "महाराष्ट्र स्वराज्य पक्ष" म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला "सप्तकिरणांसह पेनाची निब" हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.
मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !
जय स्वराज्य !












Click it and Unblock the Notifications