विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर आम्हीच करणार - रावसाहेब दानवेंचे वक्तव्य
मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही. पण राजकीय भूकंप झाला तर तो आम्हीच करणार", असे सूचक विधान रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.
विरोधक राजकीय भूकंप करु शकत नाही
रावसाहेब दानवे म्हणाले, "विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार तर नाहीच पण यांच्याकडून (विरोधकांकडून) राजकीय भूकंप होऊ शकत नाही. जर राजकीय भूकंप झालाच तर तो आम्ही करणार असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

आरक्षणाचा प्रश्न एकत्रित सोडवावा
रावसाहेब दानवे म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. यावरही समाजाचे समाधान झालं नसेल तर यावर काय मार्ग निघू शकतो? यासाठी महायुती सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यात सर्वांनी एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले पाहिजेत. पण दोन दिवसांपूर्वी जी बैठक पार पडली, त्या बैठकीला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना हे आरक्षण देण्यासंदर्भात आस्था नाही.
मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका
रावसाहेब दानवे म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय होऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र बसून यावर मार्ग काढावा. हे आमचे मत आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना आरक्षण दिले गेले. मात्र, त्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळू दिली नाही. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला.
पुढे आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. पण त्यावेळी राज्यात जे कोणी सत्तेत होतं, त्यांनी आरक्षणासाठी वकिलांची फौज आणि त्यासाठी लागणारी माहिती दिली नाही. त्यामुळे ते आरक्षण रद्द झाले अशी विरोधकांवर रावसाहेब दानवे यांनी टीका केली.
आमदारांना ठेवले हाॅटेलमध्ये
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीलाही मतं फुटण्याची भिती वाटत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवले आहे.
याबरोबरच पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याचे मार्गदर्शनही त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानभवन परिसरात मतदान होणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications