रामटेकवर शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांचा विजय; ठाकरेंचा उमेदवार फेकला गेला तिसऱ्या क्रमांकावर
Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना भगवा फडकवला. अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा यांनी २६५५५ इतक्या मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
1999 सालापासून आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलेला आहे. 1999, 2004 आणि 2009 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत आशिष जयस्वाल शिवसेनेच्या झेंड्यावर या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 साली युती तुटली आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप अशी लढत झाली त्यात भाजप उमेदवार विजयी झाला. 2019 साली रामटेक विधानसभा मतदारसंघातूनच आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले. नागपूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा असताना आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे नाना पटोले, नितीन राऊत,विजय वडेट्टीवार अशी एकाहून एक तगडी नावे समोर असतानाही रामटेक वर आशिष जयस्वाल यांचा प्रभाव कायम राहिला.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा
2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीत मंत्रीपदावर असलेले बच्चू कडू हे देखील एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि नंतर आशिष जयस्वाल यांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठबळ दिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रामटेक विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आशिष जयस्वाल यांच्या नावालाच पसंती दिली. आणि जयस्वाल यांनी शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवला.
आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून येते. रामटेक, पार्श्विनी आणि मौदा तालुक्यात दोन हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले आहेत. ज्यामुळे या तालुक्यातील खेड्यांची शहरांची असलेली कनेक्टिव्हिटी वाढली आहे. राज्य सरकारच्या हायब्रीड एन्युइटी योजनेच्या अंतर्गत 111 किलोमीटर लांबीचा अस्फाल्ट रस्ता देखील बनवण्यात आला आहे.
तब्बल ६४ बुद्ध विहारांची निर्मिती
नागपूर जिल्हा हा बौद्ध बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथेच दीक्षा घेतली होती. रामटेक विधानसभा मतदारसंघात 64 बुद्ध विहारांची उभारणी जयस्वाल यांच्या पाठपुराव्यातून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये अध्यात्मिक भावभावना वाढीस लागाव्यात या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications