"बाळासाहेबांचं निधन आधीच झालं, दोन दिवस बॉडी ठेवून काय केलं"; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप!
Ramdas Kadam Explosive Claim on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत स्फोटक आणि गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह दोन दिवस घरी ठेवून दिला होता, असा थेट आरोप कदम यांनी केला आहे.

मृत्यूच्या वेळेवर प्रश्नचिन्ह आणि 'हाताचे ठसे'चा गौप्यस्फोट
मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा हक्क नाही असे म्हटले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या वेळेबद्दल थेट प्रश्न उपस्थित केला. "बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता."
"शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठं विधान करतोय याची जाणीव मला आहे." कदम यांनी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना याबद्दल विचारण्याचे आवाहन केले.
'हाताचे ठसे' कशासाठी?
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वर का ठेवला होता? आतमध्ये काय चालले होते? याबद्दल मातोश्रीवर चर्चा सुरू होती की, "बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले.
हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते?" त्याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले आणि त्यावर कोणाची सही होती, याची माहिती काढण्याची मागणीही त्यांनी केली.
ठाकरेंवर 'टक्क्यांचे राजकारण'
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करताना त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा हव्यास असल्याचा आरोप केला. "उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा हव्यास होता. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली."
राज ठाकरेंकडे भीकेचा लोटा
"मुंबई तुमची, भांडी घासा आमची', अशी घोषणा व्हायची. आज हे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात आहेत." "आज मराठी माणूस मुंबईबाहेर केला, हे पाप उद्धव ठाकरे यांचे आहे. उद्धव ठाकरे यांनी ३० वर्षे फक्त टक्क्यांचं राजकारण केले." मुंबईचा महापौर आपला असला तरी तिथे जायचा अधिकार आम्हाला नव्हता," असेही ते म्हणाले. कदम यांनी या सर्व आरोपांमधून शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूची वेळ आणि त्यानंतरच्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उभे करत थेट उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.












Click it and Unblock the Notifications