पवित्र आहे रमजान महिना; त्यात चुकूनही करु नका 'या' चुका, वाचा सविस्तर
सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरु आहे. या महिना अत्यंत पवित्र समजला जातो. भारतातीलच काय पण जगभरातील मुस्लिम लोक या महिन्यात उपवास पाळतात. अल्लाहची पूजा करुन दिवसभर स्वतःला चांगल्या कामांमध्ये गुंतवतात. भारतात पहिला उपवास २ मार्च रोजी पाळण्यात आला. हे उपवास साधारणः २९ ते ३० दिवस पाळले जाणार आहेत.

काय आहे रमजानचा इतिहास
इस्लाममध्ये रमजानची सुरुवात दुसऱ्या हिजरी (इसवी सन ६२४) मध्ये झाली. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. उपवास हा इस्लामच्या पाच मूलभूत स्तंभांपैकी एक आहे. इस्लाममध्ये पाच स्तंभ सांगितलेले आहेत. त्यात
१. तौहीद - एका अल्लाहवर विश्वास ठेवणे आणि त्याच्या पैगंबराने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे.
२. नमाज - दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे.
३. जकात - गरिबांना दान करणे.
४. रोजा - संपूर्ण रमजान महिन्याचे उपवास.
५. हज - इस्लामिक कॅलेंडरनुसार सक्षम मुस्लिमांसाठी मक्काची तीर्थयात्रा.
रोजाचे आहे विशेष महत्त्व
रमजान महिन्यांत उपवास धरले जातात. रोजा ठेवणारे मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत किंवा पाणी पीत नाहीत. ही केवळ अन्नापासून दूर राहण्याची प्रक्रिया नाही तर ती आत्म-नियंत्रण आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचे एक साधन देखील आहे.
सेहरी-इफ्तार म्हणजे काय
उपवासाची सुरुवात सेहरीपासून होते, जी सूर्योदयापूर्वी केली जाते. यानंतर, दिवसभर काहीही खाल्ले किंवा प्यायले जात नाही आणि सूर्यास्ताच्या वेळी इफ्तारने उपवास सोडला जातो. या काळात मुस्लिम नमाज अदा करतात, अल्लाहची पूजा करतात आणि त्यांचे दैनंदिन काम करतात.
रमजानमध्ये काय टाळावे
१. उपवास करताना, केवळ खाणे-पिणे वर्ज्य करणे आवश्यक नाही, तर स्वतःचे आचरण आणि वर्तन देखील नियंत्रित करावे लागते.
२. शब्दांनी कोणालाही दुखावणे, कोणालाही इजा करणे किंवा कोणतेही चुकीचे कृत्य पाहणे निषिद्ध आहे.
३. उपवास करताना लैंगिक संबंध ठेवणे देखील निषिद्ध आहे आणि जर रात्री असे घडले तर सकाळी सेहरीपूर्वी स्वच्छ (शुद्ध) असणे आवश्यक आहे.
संयम आहे महत्त्वाचा
रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही तर आध्यात्मिक सुधारणा, आत्मसंयम आणि दानधर्माचा काळ आहे. हा महिना प्रत्येक मुस्लिमांना संयम, करुणा आणि अल्लाहच्या उपासनेत व्यस्त राहण्याची प्रेरणा देतो. रमजानच्या ३० दिवसांनंतर ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो. हा सण रमजानच्या समाप्तीचे प्रतीक आहे आणि या दिवशी लोक मशिदींमध्ये नमाज अदा करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दान (फित्रा) देऊन गरिबांना मदत करतात.












Click it and Unblock the Notifications