Raj Thackeray : राज ठाकरे यांना फडणवीसांना खरमरीत पत्र!.. काय म्हणाले मनसे अध्यक्ष वाचा 5 मुद्द्यात
Raj Thackeray's Letter to CM Fadnavis : महाराष्ट्रात झालेल्या विक्रमी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक 'धगधगता' पत्र लिहून राज्यातील परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासोबतच पूरग्रस्त भागातील इतर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या पत्रातील पाच प्रमुख मुद्दे महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीचे प्रतिबिंब दाखवत आहेत, आणि सरकारला कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन करत आहेत.

१. ओला दुष्काळ आणि भरपाई: 'तुटपुंज्या' मदतीचा निषेध
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात, कोणत्याही निकषांची वाट न पाहता महाराष्ट्रात सरसकट 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सध्या दिली जाणारी ७ ते ८ हजार रुपयांची मदत 'तुटपुंजी' असल्याचा आरोप केला. याऐवजी, सरकारने प्रत्येक एकरासाठी किमान ३० हजार रुपयांची भरपाई जाहीर करावी, अशी त्यांची मागणी आहे. शेतकऱ्याला पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी किमान एक वर्ष लागेल, त्यामुळे ही मदत कमीतकमी ३० ते ४० हजार रुपये असावी, असे त्यांनी म्हटले आहे.
२. केंद्र सरकारकडे मदतीची मागणी: 'दिल्लीत फक्त वैयक्तिक भेटी नको'
राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना राज यांनी 'सरकारने हात आखडता घेऊ नये' असे म्हटले आहे. गरज पडल्यास, केंद्राकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रासाठी विशेष मदत पॅकेज मिळवावे, अशी त्यांची सूचना आहे. त्यांनी बिहारला मिळालेल्या पॅकेजचा दाखला देत, महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी असे म्हटले आहे. तसेच, सरकारमधील सर्व पक्षांनी फक्त वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत न जाता, राज्याच्या हितासाठी दिल्लीत धाव घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
३. मुला-मुलींच्या शिक्षण थांबू नये
आपत्तीनंतर सर्वाधिक फटका मुलांच्या शिक्षणाला बसतो. त्यामुळे एकाही मुलाचे शिक्षण थांबू नये यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी असे त्यांनी म्हटले आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके उपलब्ध करून द्यावीत आणि परीक्षेच्या वेळी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथेही दिसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रति,
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2025
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या…
४. आरोग्य सेवा: रोगराईचा धोका आणि औषधांचा तुटवडा
पुराच्या संकटानंतर रोगराई वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली आहे. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सर्व ठिकाणी औषधांचा तुटवडा पडणार नाही, याची सरकारने खात्री करावी असे त्यांनी म्हटले आहे.
५. कर्ज वसुली: 'बँकांना समज द्या, नाहीतर आमचे सैनिक देतील'
या आपत्तीनंतर बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू होतो. हा विषय अतिशय तापदायक असतो. त्यामुळे सरकारने बँकांना तातडीने योग्य ती समज द्यावी, अन्यथा 'आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच,' अशा शब्दात राज यांनी सरकारला इशारा दिला आहे. पत्राच्या शेवटी, सरकार बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राची संस्कृती नाही असे त्यांनी म्हटले आहे. आता सरकारने तातडीने किमान ३० ते ४० हजारांची मदत घोषित करून शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अतिवृष्टीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.












Click it and Unblock the Notifications