काल 'ठाकरे ब्रँड'चा पराभव, आज राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, उद्धव यांना धक्का की नवी चाल?
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड समोर आली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत 'ठाकरे ब्रँड' ला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे, या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती याचे वृत्त समोर आलेले नाही, परंतु, हा उद्धव ठाकरेंचा पराभव करण्याचा तर डाव नसेल ना, की नवीन काही चाल आखली जात आहे, अशा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभव
अलीकडेच मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट पतपेढीच्या २१ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. 'ठाकरे ब्रँड' म्हणून या निवडणुकीचा जोरदार गाजावाजा झाला होता.
मात्र, निकालामध्ये 'ठाकरे ब्रँड'चा पुरता धुव्वा उडाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा मिळवल्या, तर महायुतीच्या 'सहकार समृद्धी पॅनेल'ने ७ जागांवर विजय मिळवला.
या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मात्र, त्यांनी राज ठाकरेंवर टीका करणे टाळले. यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याचं बोललं जात होतं.
या पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीला गेल्याने, राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे मार्ग अजूनही खुले ठेवले आहेत, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.
भेटीचे राजकीय महत्त्व
या भेटीमागे अनेक राजकीय समीकरणे दडलेली असू शकतात. अधिकृतपणे ही भेट नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरीही नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ही भेट झाल्याने त्याचे राजकीय महत्त्व वाढले आहे. यापूर्वी १२ जून रोजीही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती.
त्यावेळी शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने युतीच्या प्रक्रियेला वेग आला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. मात्र, आताच्या भेटीमुळे शिवसेना-मनसेच्या संभाव्य युतीच्या प्रक्रियेला ब्रेक लागेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या भेटीवर कोण काय म्हणाले?
उदय सामंत (शिंदे गट) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघेही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये यावे, अशी आमची इच्छा आहे."
संजय राऊत (ठाकरे गट) म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील किंवा राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असेल."












Click it and Unblock the Notifications