राज-उद्धव भेटीनंतर युतीचे वाहू लागले वारे; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!, म्हणाले- जरा तरी भान...
Raj Thackeray Latest News in Marathi : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यातील एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युतीचे वारे वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे दिसत असताना, राज ठाकरे यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
इगतपुरी येथील मनसेच्या शिबिरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजीच्या विजयी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, तो मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. युतीबद्दल विचारले असता, त्यांनी 'युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता?' असे उत्तर दिले. मात्र, यानंतर काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी तसेच निवडक माध्यमांनी राज ठाकरे बोलले नसतानाही, 'युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल', असे विधान त्यांच्या तोंडी घातले. यावर राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या'
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का?"
काही मोजके पत्रकार कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, "तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा?"
राज ठाकरे यांनी टाइम्स ऑफ इंडियासारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रानेही शहानिशा न करता अशी बातमी छापल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रकारचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) July 16, 2025
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी…
'..तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन'
राज ठाकरे यांचा पत्रकारितेशी जुना आणि जवळचा संबंध आहे. त्यांच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. स्वतः व्यंगचित्रकार म्हणून 'मार्मिक', 'लोकप्रभा', 'आवाज', 'लोकसत्ता' ते 'सामना' असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता कशी असते याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.
या पार्श्वभूमीवर, त्यांनी काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना असे प्रकार न करण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांना कोणतेही राजकीय विधान करायचे असल्यास, ते अधिकृत पत्रकार परिषद घेऊनच करतील. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, राज ठाकरे सध्या तरी युतीबाबत कोणताही ठोस पवित्रा घेण्यास तयार नाहीत.












Click it and Unblock the Notifications