शेवटच्या क्षणी 'गेम' फिरला! फडणवीसांचा 'एक' फोन अन् प्राजक्त तनपुरेंचे मन वळवण्यात भाजपला यश?
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र, ही निवडणूक सोपी व्हावी यासाठी भाजपने शेवटच्या क्षणी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. बारामती पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे अडथळे दूर करण्यात यश आले, तसाच 'राहुरी पॅटर्न' राबवण्यासाठी भाजपचे संकटमोचक मैदानात उतरले आहेत.

सोमवारी सकाळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली, जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अचानक शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला पोहोचले. या दिग्गज नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड खलबतं झाली. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरून बोलणे करून दिले. मुख्यमंत्र्यांनी राहुरीच्या विकासाबाबत आणि तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
या अनपेक्षित भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांची भूमिका मवाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असून विकासाच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले आहे. आपला उमेदवारी अर्ज तयार असला तरी, ज्या जनहिताच्या मुद्द्यांसाठी आपण निवडणूक लढवणार होतो, तेच प्रश्न जर सरकार सोडवण्यास तयार असेल, तर माघार घेण्याबाबत विचार करता येईल. मात्र, अंतिम निर्णयापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तनपुरे यांच्या या सावध पवित्र्यामुळे राहुरीची निवडणूक भाजपसाठी सोपी होण्याची शक्यता आता बळावली असून, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय घडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications