Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कशाने झाला?, विधिमंडळाच्या चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे, IPSवर कारवाई..

Pune Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात वैष्णवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हे, तर कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी केलेला बळी असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Pune Vaishnavi Hagawane Death Case

समितीच्या अहवालातील मुख्य शिफारसी आणि निष्कर्ष

समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, वैष्णवीचा मृत्यू ही केवळ आत्महत्येची घटना नसून, तो हुंडाबळीचा प्रकार आहे. पोलिसांनी याच दिशेने सखोल तपास करण्याची गरज आहे. अहवालातील प्रमुख शिफारसी आणि त्रुटी खालीलप्रमाणे:

हुंडाबळीचे प्रकरण

वैष्णवीचा मृत्यू नैसर्गिक किंवा केवळ आत्महत्या नसून, तो पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळी असल्याचे स्पष्टीकरण.

आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर ठपका

या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यांच्या कथित ध्वनिफितीही समोर आल्या आहेत. त्यामुळे सुपेकर यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच, सुपेकरांना तपासापासून दूर ठेवण्याचीही आवश्यकता व्यक्त केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष

पुणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच वैष्णवीची आत्महत्या घडल्याचे समितीने म्हटले आहे. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिने यापूर्वीही मारहाण, छळ, विनयभंग आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

तपास तातडीने पूर्ण करण्याची शिफारस

अहवालात तपासातील त्रुटी दूर करून तो तातडीने पूर्ण करण्याचे आणि कोणताही आरोपी किंवा सहआरोपी सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

तपासात आढळलेल्या प्रमुख त्रुटी

समितीने तपासात अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत:

  • वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी आवश्यक.
  • जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा.\
  • प्रकरण केवळ आत्महत्येचे नसून, पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे आहे.
  • जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास त्यांना निलंबित करून सहआरोपी करा.
  • वैष्णवी हगवणे यांना पती आणि सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ आणि जाच झाल्याचे पुरावे.
  • हुंड्याच्या रुपात ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, सोने आणि रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे.
  • तपास तातडीने पूर्ण करून, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय?

हे प्रकरण 16 मे 2025 रोजी घडले, जेव्हा वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी असे मोठे हुंड्यापोटी देण्यात आले होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पती शशांक हगवणे आणि तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामांवरून वैष्णवीसोबत भांडणे सुरू केली.

तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू झाले. पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक छळ केला आणि तिला वाईट वागणूक दिली. पोस्टमार्टम अहवालातही वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते, ज्यामुळे ही केवळ आत्महत्या नसून छळाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले.

विधिमंडळाच्या या अहवालानंतर आता या प्रकरणाला निश्चितच वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. दोषींवर कठोर कारवाई होते का आणि वैष्णवीला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+