मनसे VS ABVP मध्ये संघर्षाची ठिणगी: "तुम्ही बोट लावाल, तर आम्ही हात लावू," अमित ठाकरेंचा इशारा
Amit Thackeray Warns ABVP : पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) शाखा सुरू करण्यावरून मनसे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या भाजपप्रणित विद्यार्थी संघटनेत मोठा संघर्ष उफाळला आहे.
हा वाद इतका वाढला की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना तातडीने पुण्यात धाव घ्यावी लागली. त्यांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना "तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांना बोट लावले, तर आम्ही हात लावू," असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यामुळे पुण्यात दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद आता नव्या आणि तीव्र टप्प्यावर पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

वादाची ठिणगी आणि टाळे ठोकण्याचे नाट्य
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये मनसेची शाखा सुरू करण्याच्या कार्यक्रमादरम्यान हा वाद सुरू झाला. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये लावलेल्या पोस्टरमध्ये इतर विद्यार्थी संघटनांना दुय्यम लेखून, वाडिया कॉलेजमध्ये केवळ आपलेच वर्चस्व असेल, असा मजकूर लिहिला होता. यातूनच संघर्षाची ठिणगी पडली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट सदाशिव पेठेतील एबीव्हीपीच्या मुख्य शाखेला टाळे ठोकले.
अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, पोलिस आयुक्तांची भेट
या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी मंगळवारी तातडीने पुण्यात येऊन पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि संबंधित एबीव्हीपी कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. "काल वाडिया कॉलेजमध्ये राडा झाला. त्यानंतर आज मी आयुक्तांची भेट घेतली. असा प्रकार दुसऱ्यांदा झाला आहे. ते सत्तेत असले तरी किंवा आमच्यावर कितीही दबाव टाकला तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही."
अमित ठाकरे यांचा स्पष्ट इशारा
"तुमच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळेल. तुम्ही बोट लावले, तर आम्ही तुम्हाला हात लावू. मला येथील कायदा-सुव्यवस्था बिघडवायची नाही. पण कायदा सर्वांना समान असावा, एवढेच माझे म्हणणे आहे."
"पोस्टर लावणारे एबीव्हीपीचे निघाल्यास कार्यालये बंद करू"
एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांच्या मार्गात अडसर निर्माण करण्याऐवजी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा टोला अमित ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले की, पोस्टर लावणाऱ्यांची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
"पोस्टर लावणारे एबीव्हीपीचे कार्यकर्ते निघाले, तर त्यांची सर्वच कार्यालये बंद करावी लागतील. ती मुले कोण आहेत? हे तपासून आमची यापुढे अशीच रिअॅक्शन मिळेल."
अमित ठाकरे यांच्या या थेट इशाऱ्यानंतर पुणे शहरातील एबीव्हीपी आणि मनसे यांच्यातील वाद वाढण्याची आणि संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












Click it and Unblock the Notifications