दिवा विझताना फडफडतो! राज्यसरकारची तीच स्थिती, लाडकी बहीण योजनेचे निवडणुकीनंतर काय? या नेत्याचा सवाल
नवी दिल्ली : दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती झाली आहे. युपीए सरकारने कायदा करून योजनांचा लाभ द्या, असे सांगितल होते. आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय ? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे. युपीए सरकारने कायदा करून योजनांचा लाभ द्या अस सांगितल होते. आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय ? घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या. योजना जाहीर करायच्या पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची ?

मतांसाठी योजनांची घोषणा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा का? जुलै महिन्यात बजेट अधिवेशनात फक्त घोषणा होत्या, त्या तुम्हाला बाहेरही करता आल्या असत्या. राज्यावर आणखी किती कर्ज काढणार आहेत ? या फक्त पोकळ घोषणा आहे अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी राज्य सरकारवर केली.
1 कोटीची घोषणा करायची आणि तरतूद करायची 10 लाखांची अशी ही परिस्थिती आहे. सरकार उद्योगधांद्याबाबत अधिवेशनात म्हणाले होते आम्ही श्वेतपत्रिका काढू पण ती कधी काढणार त्यावर काहीच सांगत नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्प मध्ये मोठा स्कॅम आहे, त्याचीही श्वेतपत्रिका काढू म्हणाले पण ती निवडणुकीपूर्वी काढावी. या सगळ्या घोषणा मतांसाठी होत आहेत.
भाजपला दंगलीशिवाय जिंकता येत नाही
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला होता. या सर्व प्रकरणानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप-आरएससवर निशाणा साधला. दंगली हेच भाजपचं धोरण आहे. राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
भाजपचा पराभव अटळ
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, येत्या दोन्ही विधानसभेत मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्रातील एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही. काँग्रेसच्या बैठकीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या दोन बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल.












Click it and Unblock the Notifications