कोल्हापूरी चप्पल आता जगभर चालणार, प्राडासोबतचा वाद मिटणार; नेमकं काय झालं?
कोल्हापुरी 'पायताण' आता सातासमुद्रापार जाणार आहे! इटालियन फॅशन कंपनी प्राडाने (Prada) कोल्हापुरातील कारागिरांसोबत करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात, प्राडाचे एक शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांनी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली.

प्राडा शिष्टमंडळाची कोल्हापूरला भेट
प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यातील पूर्वीचा वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इटलीहून आलेल्या प्राडाच्या शिष्टमंडळात कंपनीचे संचालक, एक व्यवस्थापक आणि दोन सल्लागार यांचा समावेश होता. त्यांनी कोल्हापुरी चप्पल कशी तयार केली जाते, याची सविस्तर माहिती कारागिरांकडून जाणून घेतली. चप्पल निर्मितीच्या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली.
कारागिरांशी कराराची शक्यता
प्राडाची ही टीम इटलीला परत गेल्यानंतर लवकरच आणखी एक टीम कोल्हापूरला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान, स्थानिक कारागिरांसोबत अधिकृत करार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापुरी चप्पलची विक्री जागतिक पातळीवर पोहोचेल आणि त्याचा थेट फायदा कोल्हापुरातील कारागिरांना होईल.
'मेक इन इंडिया-कोल्हापूर' मोहिमेला बळ
प्राडाने यापूर्वीच आपली चप्पल महाराष्ट्रातील हस्तनिर्मित कोल्हापुरी चपलेपासून प्रेरित असल्याचे मान्य केले आहे. 'मेक इन इंडिया-कोल्हापूर' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्यास प्राडा उत्सुक आहे.
दीर्घकालीन सहकार्याचा मानस
प्राडा आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यात याआधी एक ऑनलाईन बैठक झाली होती. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, ब्रँड विकास आणि न्याय्य व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी, प्राडाने महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांसोबत दीर्घकाळ सहकार्य करण्याचा हेतू स्पष्ट केला होता. केवळ कोल्हापुरी चप्पलच नव्हे, तर पैठणी, चांदीचे पैंजण आणि इतर स्थानिक हस्तकला प्रकल्पांवरही सहकार्य करण्याची इच्छा प्राडाने व्यक्त केली आहे.
सध्या कोल्हापूरमध्ये सुमारे 1 लाख कारागीर कोल्हापुरी चप्पल व्यवसायात गुंतले आहेत, ज्यांची वार्षिक उलाढाल 1,400 ते 1,500 कोटी रुपये आहे.
कोल्हापुरी चपलेवरून पूर्वीचा वाद
इटलीच्या प्राडा कंपनीने त्यांच्या उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चपलेचा वापर केला होता. मात्र, त्यावेळी कोल्हापूरच्या नावाचा उल्लेख न करता हे उत्पादन त्यांचेच असल्याचा दावा केला होता. यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानंतर, प्राडाने भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करत कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती. प्राडाचे संचालक लोरेंझो बर्टेली यांनी याबाबत चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना पत्रही पाठवले होते.












Click it and Unblock the Notifications