दांडगा जनसंपर्क असलेला लोकप्रिय आमदार 'संतोष बांगर'; हिंगोलीच्या पुरात उतरून केली जनसेवा
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना म्हणजे तरुण आणि सळसळत्या रक्ताचे शिवसैनिक. मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक आणि मराठवाड्यात राजकारणाच्या परिघापासून बाहेर असणाऱ्या तरुणांनी शिवसेनेला आणि बाळासाहेबांचे नेतृत्वाला आपलं मानलं. तरुणांचे जथेच्या जथे शिवसेनेत दाखल झाले. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी आणि राजकीय पुण्याई नसतानाही सामान्य जनतेनेही या शिवसैनिकांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली. अडीअडचणीला पाठीशी पहाडासारखे उभे राहणारे हे शिवसैनिक सामान्य जनतेचा आधार बनले.असाच एक रांगडा शिवसैनिक म्हणजे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर.
भरघोस दाढी मिशा, खांद्यावर भगवे उपरणे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि तोंडात रांगडी भाषा. प्रशासनाला नेहमीच भिडणाऱ्या या तरुणाने हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचे वादळ निर्माण केले. 2017 साली म्हणजे वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी हिंगोली जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेने त्यांची नियुक्ती केली आणि त्यानंतर दोनच वर्षात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची संधी संतोष बांगर यांना मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा 16000 मतांनी पराभव करून संतोष बांगर पहिल्यांदा विधानसभेत दाखल झाले.

पहिली आमदारकी आणि पक्षात उलथापालथ
त्यांची पहिलीच कारकीर्द पक्षात वेडी वाकडी वळणे घेऊन आली. 2019 आली संतोष बांगर आमदार झाले आणि 2022 साली शिवसेनेत न भूतो न भविष्यती अशी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षातील बहुसंख्या आमदारांनी पाठिंबा दिला. अनेक मंत्री ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. संतोष बांगर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. पण विश्वास दर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि ते शिंदे यांच्या सोबतच राहिले.
हल्ल्याचा प्रयत्न
वादग्रस्त विधाने, विरोधकांना शिंगावर घेण्याची तयारी, प्रशासनाच्या विरोधात वादग्रस्त आणि आक्रमक आंदोलने, अधिकाऱ्यांना दमात घेणे यामुळे संतोष बांगर नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा सातत्याने होत असली तरी सामान्य माणसात त्यांची लोकप्रियता कायम राहिली. विशेषतः कावड यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनांची असलेली नाळ दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने त्यांच्या समवेत असलेला जनसमुदाय त्यांच्या लोकप्रियतेची पावती आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर संतोष बांगर यांच्यावर अमरावती येथे हल्ल्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. परंतु त्या हल्ल्यालाही संतोष बांगर इतक्याच आक्रमकपणे आणि शिवसेना स्टाईलने सामोरे गेले.
हिंगोलीच्या पुरात दाखवला अस्सल शिवसैनिक
एरवी आक्रमक वाटणारे संतोष बांगर मनाने किती मृदू आणि लोकांच्या मदतीला धावणारे आहेत याचे दर्शन हिंगोली च्या अतिवृष्टीच्या दरम्यान घडले. दोन-तीन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात पुराने थैमान घातले. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले. पुरात अडकलेल्या या लोकांसाठी संतोष बांगर स्वतः पाण्यात उतरले. असंख्य लोकांना मदत केली. आमदार झालो असलो तरी रक्तात शिवसैनिकच आहे हेच त्यांनी दाखवून दिले. पुरात उतरून त्यांनी केलेल्या मदत कार्याचे त्यांच्या विरोधकांनीही कौतुक केले. त्यांच्या मदत कार्याच्या चित्रफिती सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या. आणि दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे त्यांना मिळणारी मदत आणि भरपाई दिवाळीच्या पूर्वी अदा करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे आणि सरकार दरबारी लावून धरली.
पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष
आपल्या पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदार संघाच्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या प्रयत्नातून बाळापुर कांडकी, बोधि रामेश्वर तांडा आणि दिग्रस बुद्रुक ते कडगाव या रस्त्यांची 248 कोटींची कामे पूर्ण करण्यात आली. बामूग, ढोलक्याची वाडी, काळपदेव, वेंकंडी, बाभळी आणि येळीगाव येथे 232 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात आली. पार्डी मोड येथे विपश्यना केंद्रासाठी 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी 35 एकर जमीन देखील देण्यात आली.
पेडगाव पाटी, चिंचोली, इसापूर, खानापूर आणि टाकळी शेड येथील रस्त्यांसाठी तीन कोटी आणि 18 लाख रुपये दूर करण्यात आले आहेत. येळेगाव गवळी, कांदळी, डोंगरकडा, वडगाव, डिग्रस, कुंडकर पुम्परी, येळेगाव सोळंके, सिद्धेश्वर, पेडगाव, सिरसाम, जोदतळा, कावरखेड आणि खानापूर येथे सभा मंडप उभारणीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जनसंपर्काच्या जोरावर आमदारकी मजबूत
तळागाळात असलेला जनसंपर्क, सामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती आणि मतदार संघाच्या ग्रामीण भागात धडाक्याने केलेली विकासकामे यांच्या जोरावर सलग दुसऱ्या वेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवण्याची पूर्ण तयारी संतोष बांगर यांनी केली आहे. त्यांच्याभोवती जमणारे जनतेचे मोहोळ पाहता त्यांच्या इच्छेची आणि महत्त्वाकांक्षाची पूर्ती होईल अशी चर्चा हिंगोली जिल्ह्यात आहे.












Click it and Unblock the Notifications