अखेर पंकजा मुंडे व आ. सुरेश धस आले एकाच व्यासपीठावर; फडणवीसांच्या मध्यस्थीने वाद मिटला..?
महाराष्ट्रात चर्चेत असणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे उपस्थित आहेत. आ. धस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचा प्रारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमापेक्षा आ. धस व मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याच्या चर्चा जास्त झाल्या. मंत्री मुंडे या आ. धस यांच्या कार्यक्रमाला येणार का, हा प्रश्न होता. मात्र मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

काय होता कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आ. सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील 30 गावांतील 80 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तिसऱ्या वेळी आमदार असताना आमदार सुरेश धस यांनी 500 एमसीएफटी पाणी कुकडी प्रकल्पातून मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातून हे काम मार्गी लागले होते. या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागात निश्चितच हरितक्रांती घडेल, अशा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
मंत्री मुंडे यांची उपस्थिती
यापूर्वी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या कार्यक्रमासाठी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे व आ. सुरेश धस पहिल्यांदा एकत्र दिसले होते. आता सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे येतील का, हा प्रश्न होता. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर आ. सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी झाला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला त्या आष्टीला येतील का, हा प्रश्न होता. मात्र मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.
वाद मिटला का?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आ. सुरेश धस यांनी लावून धरले आहे. त्यात मंत्री धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आ. धस यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. त्यामुळे आष्टीतील कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे येतील का, हा प्रश्न होता. परंतु मुख्मयंत्री फडणवीस हे स्वतः या कार्यक्रमाला येत असल्याने मंत्री पंकजा मुंडेही आल्या. फडणवीस पुढाकारातून मुंडे-धस यांच्यातील वाद मिटला का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.












Click it and Unblock the Notifications