महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी माणूस हरवलेला नाही, सगळ्यांना बाहेर घालवायची व्यवस्था केली- फडणवीस
Devendra Fadnavis on Pakistani citizen in Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत आज अतिशय महत्त्वाचे विधान केले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री या नात्याने सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. काही माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्ताना पाठवले जाईल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राकडून सूचना
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज (27 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत.
भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रत्येक राज्यात आलेले पाकिस्तानी नागरिकांना आजच्या आज देश सोडावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
योगेश कदम यांनी काय दिली माहिती?
राज्यातल्या 48 शहरात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिणीशी बोलताना दिली होती. त्यामध्ये ते म्हणाले की, नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
5 हजारांपैकी 51 जणांकडे वैध कागदपत्रं
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात सुमारे पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिकांपैकी 51 पाकिस्तानी नागरिकांकडे वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. यासर्व वावड्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या-सुलट्या बातम्या चर्चा करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
फ्लेक्झबाजीवर आळा घातला जाईल
राज्यातील शहराशहरांमध्ये करण्यात येत असलेली फ्लेक्सबाजी बंद करायला हवी. फ्लेक्सबाजीवर टाच आणायला हवी. कारण त्यामुळे शहरांचे सौदर्यं खराब होत आहे. कोणाला फ्लेक्स लावायचे असेल तर त्यांनी ते अधिकृत होर्डिंगवर फ्लेक्स लावा. माझे स्वत:चे अनधिकृत फ्लेक्स काढा, असे मी महानगरापालिकांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.












Click it and Unblock the Notifications