Oneindia Exclusive : तर ओबीसींचा एखादा तहसीलदार होणंही कठीण, हाके स्पष्टचं बोलले
प्रीतेश सूर्यवंशी|पुणे आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही, ओबीसी आरक्षणामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही. उलट मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास ओबीसींच आहे ते आरक्षण उध्वस्त होईल, असं परखड मत ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मांडलं आहे.
प्रा. लक्ष्मण हाके यांनी वन इंडिया मराठीसोबत बातचीत केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी हाके यांनी मनोज जरांगे, शरद पवार, विखुरलेले ओबीसी, विधानसभा निवडणुकीतील रणनिती, एकनाथ शिंदे यांची ओबीसींबद्दलची भूमिका या आणि अशा अनेक प्रश्नांवर भाष्य केलं.

ओबीसीतून आरक्षण हा पर्याय नाही
हाके पुढे म्हणाले, आरक्षण हा गरीबी हटावसाठीचा कार्यक्रम नाही. ज्या जातींना मुख्य प्रवाहात येण्यापासून डावललं जात होत त्या जातींना प्रतिनिधित्व मिळाव यासाठी आरक्षण आहे. राज्याच्या सत्तेच्या चाव्या या मराठा समाजाच्या हाती आहेत.
सर्वाधिक शिक्षण संस्था किंवा, राजकारण आणि नोकरीत सर्वाधिक प्रतिनिधित्व मराठा समाजाच आहे. यामुळे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी करणं चुकीच असल्याच हाके यांनी यावेळी सांगितलं.
मनोज जरांगेवर प्रहार करत हाके म्हणाले, मनोज जरांगे हे अशिक्षित आहेत. मनोज जरांगेंना आरक्षणातलं काहीही कळत नाही. त्यांचा कुठल्याही विषयावर अभ्यास नाही. ते सरकारवर दबाव टाकून मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करताहेत. मनोज जरांगेंनी किंवा त्यांच्या सल्लागारांनी माझ्यासमोर चर्चेसासाठी बसून दाखवाव असं आव्हान हाकेंनी यावेळी जरांगेंना दिलं.
शरद पवारांचा हाकेंना फोन?
आंदोलनादरम्यान शरद पवारांचा काही फोन आला का, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार गरीब मेंढपाळाच्या मुलाला कशासाठी फोन करतील असा टोला हाकेंनी लगावला. शरद पवार केवळ स्वजातीय आंदोलनाला भेट देण्यासाठी जातात असा आरोपही त्यांनी केला.
हाके पुढे म्हणाले की, शरद पवारांच पुरोगामीत्व खोटं आहे. त्यांच्या निवडून आलेल्या १० खासदारांपैकी जास्त खासदार हे कुठल्या समाजाचे आहेत?, जेव्हा महत्त्वाची पदं द्यायची असतात तेव्हा ती नातेवाईकांना दिली जातात अशी टीका हाकेंनी केली.
भुजबळांनी उघडपणे भूमिका घेतली
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण बाजूला ठेऊन उघडपणे भूमिका केवळ छगन भुजबळ यांनी घेतली असल्याचे सांगत हाके म्हणाले, छगन भुजबळ सुरूवातीपासून निर्भीडपणे बोलत आहेत. त्यांनी पक्षीय राजकारणच्या पलीकडे जाऊन थेट भूमिका घेतली आहे. यामुळेच मनोज जरांगेंकडून एकट्या भुजबळांना टार्गेट केलं जात असल्याच हाके म्हणाले.
तसेच जरांगे एकीकडे भुजबळांना टार्गेट करतात आणि दुसरीकडे पंकजा मुंडे, महादेव जानकर, चंद्रकांत खैरे कसे पराभूत होतील यासाठी बैठका घेतात असा टोला हाकेंनी यावेळी लगावला. जालन्यात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना मतदान करू नका असा फतवा जरांगेंनी काढल्याचा आरोप हाकेंनी केला.
तोडगा कोणाकडे केंद्र की राज्य सरकार
आरक्षणावर अंतिम तोडगा केंद्राकडे आहे की राज्य सरकारकडे आहे असा प्रश्न उपस्थित केल्यावर हाके म्हणाले, केंद्र सरकारने आपली जबाबदारी पाडली आहे. केंद्र सरकारने १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेल आहे. मराठा समाजाने या आरक्षणाचा लाभ घ्यायला हवा. ओबीसीतून आरक्षण हा पर्याय नसल्याचा पुनर्रुच्चार हाकेंनी केला.












Click it and Unblock the Notifications