पावसाचं रौद्ररुप, रेस्क्यू ऑपरेशन करुन 16 जणांना वाचवलं
मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाने जोरदार झोडपले. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस झाला. मुंबई व उपनगरासह कल्याण, कसारा परिसरात पावसाचा जोर जास्त होता. या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. ओव्हरहेड वायरवर झाडं कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, उसगाव, पालघर या परिसरातील काही शेतमजूर पुराच्या पाण्यात अडकले होते. एनडीआरएफच्या टीमने 16 पुराच्या विळख्यातून सुखरुप सोडवले.

मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत
मुंबईसह काही उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे उंबरमाळी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. वशिंद स्टेशनजवळ ट्रॅकवर वाळू, माती जमा झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
दुसरीकडे पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक रेल्वे गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना खाजगी वाहन करुन नाशिकपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. तसेच मुंबई ते नाशिक ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. सध्या इगतपुरी रेल्वे स्थानकातून डाऊन मार्गाची गोरखपूर एक्स्प्रेस ही पहिली गाडी नाशिक रोडच्या दिशेने रवाना झाली होती.
चाकरमान्यांचे प्रचंड हाल
मध्य रेल्वेची कसारा सीएसएमटी सेवा विस्कळीत झाली आहे. वाशिद, खडवली, आटगाव दरम्यान माती वाहून गेल्याने पोल वाकला आहे. त्यामुळे ओव्हरहेड वायरवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे स्टेशनच्या पुढे असलेल्या ट्रकवर झाड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
टिटवाळा ते कसारा दरम्यान डाऊन मार्ग पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसामुळे रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांचे यामुळे प्रचंड हाल झाले.
झाडे पडली, रेल्वे ट्रँकवर वाळू
ठाणे ते कसारादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते. मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. आटगाव ते वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे. यामुळे ठाणे ते कसारा आणि कसारा ते ठाणे या ठिकाणी जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सध्या रेल्वे प्रशासनाकडून ओव्हरहेड वायरवर पडलेले झाड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथे मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातून येणाऱ्या अनेक गाड्या अडकल्याचे चित्र दिसत आहे. मंगलोर एक्सप्रेस ही गाडी कळंबोली या ठिकाणी अडकली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी हे गाडीतून उतरुन जाताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications