'विलीनीकरणानंतर अजित दादाच होणार होते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा'; शरद पवारांच्या पक्षाचा खुलासा
NCP merger update shashikant shinde revelation : राज्याच्या राजकारणात 'राष्ट्रवादी काँग्रेस'च्या विलीनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चेला आता एका नव्या खुलाशामुळे मोठे वळण मिळाले आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकातून एक अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील दावा केला आहे. विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याची शरद पवार गटाची तयारी होती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

'त्या' निर्णयाचा गुपित उलगडा; शशिकांत शिंदेंचे अध्यक्षीय भाष्य
साप्ताहिकातील आपल्या विशेष लेखात शशिकांत शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणतात, "विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पक्षाची सर्व सूत्रे अजित दादांच्या हाती सोपवण्याचा निर्णय आमच्याकडून झालेला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते." दादांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी आम्ही सर्वजण मानसिकदृष्ट्या तयार होतो, अशी मोठी कबुली त्यांनी या लेखातून दिली आहे.
अजित पवारांच्या पश्चात नव्या राजकीय हालचाली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या बदलत्या परिस्थितीत आता विलीनीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जरी शरद पवार यांनी यावर उघडपणे भाष्य टाळले असले, तरी शशिकांत शिंदेंच्या या लेखामुळे पडद्यामागील हालचाली आता चव्हाट्यावर आल्या आहेत.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली!
"दादांचे एक स्वप्न अधुरे राहिले आहे आणि ते पूर्ण करणे ही आता आपली जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकवटून मजबुतीने उभा करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून 'मन मोठे' करावे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications