Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करतायं? तर नाशिक जिल्ह्यातील 'ही' 5 पर्यटनस्थळं ठरतील उत्तम पर्याय

पावसाळा सुरू झाला की सृष्टी नव्याने खुलते. झाडांवर नवी पालवी, डोंगरांवर हिरवी चादर, आणि गडगडणाऱ्या ढगांसोबत बरसणारा पाऊस - अशा वातावरणात मन आपसूकच कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात जायला धाव घेतं.

top places to visit in nashik in rain


नाशिक जिल्हा हा पावसाळ्यात पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण मानला जातो. डोंगर-दऱ्या, धबधबे, ऐतिहासिक किल्ले आणि हिरवळीने नटलेली घाटरांगं - हे सगळं काही इथे आहे. चला तर मग पाहूया पावसाळ्यात नक्की भेट द्यावीत अशी नाशिक जिल्ह्यातील ५ पर्यटन स्थळं.

1. अंजनेरी गड - पाऊस आणि अध्यात्म यांचं सुंदर संमेलन

अंजनेरी गड हा केवळ ट्रेकिंगप्रेमींसाठीच नाही तर अध्यात्मिक भाविकांसाठीही महत्त्वाचं ठिकाण आहे. हनुमानाच्या जन्मस्थळाचा इतिहास सांगणारा हा गड पावसाळ्यात अधिकच खुलतो. गड चढताना वाटेत दिसणारे छोटे धबधबे, पायथ्याशी पसरणारी धुके आणि टोकावरून दिसणारे नाशिकचे दृश्य नक्कीच विसरता येणार नाही.

2. दुगारवाडी धबधबा - निसर्गाचं गूढ रुप

नाशिकपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेला दुगारवाडी धबधबा म्हणजे एक लपलेलं रत्न. पावसाळ्यात हा धबधबा खऱ्या अर्थानं जिवंत होतो. आजूबाजूचं घनदाट जंगल, धुक्याचं साम्राज्य आणि धबधब्याचा कोसळणारा आवाज मनामध्ये थरार निर्माण करतो. थोडं चालत जावं लागतं, पण निसर्गाशी एकरूप होण्याचा तो अनुभव नक्कीच अनमोल आहे.

3. सप्तशृंगी गड - श्रद्धा आणि सौंदर्याचं प्रतीक

वणीजवळील सप्तशृंगी देवीचं मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. पण पावसाळ्यात या गडाचा परिसर श्रद्धेच्या पलिकडचा देखावा सादर करतो. डोंगरावरून ओघळणारे लहान-मोठे धबधबे, दाट धुके आणि हिरवीगार पर्वतरांगांमधून मंदिराचा उंच माथा पाहणं, हे खरंतर एक अलौकिक दृश्य असतं.

4. इगतपुरी - निसर्गाचा थेट साक्षात्कार

पावसाळा म्हटला की इगतपुरी आठवलंच पाहिजे! पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण वर्षा ऋतूत निसर्गप्रेमींसाठी एक वरदानच ठरतं. प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस, भरभरून वाहणारे धबधबे, धुक्याचा पडदा आणि शांत वातावरण - इगतपुरीत वेळ जसा थांबतो तसाच आपलाही श्वास काही काळ थांबतो. गायवझरा आणि भावली धबधबा हेही नजरेआड जाता कामा नये.

5. हरिहर किल्ला - साहस आणि सौंदर्य यांची परिपूर्ण जोडी

हरिहर किल्ला हा साहसाची आवड असणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. किल्ल्याच्या ८० अंश कोनात कोरलेल्या पायऱ्या पाहून सुरुवातीला थोडं दडपण येतं, पण जसजसं वर जातो, तसं निसर्गाचं रूप अधिकच अप्रतिम वाटतं. पावसाळ्यात हा अनुभव अजूनच रोमांचक होतो - पायथ्यापासून शिखरापर्यंत प्रत्येक टप्पा एक नवीन दृश्य उलगडतो.

निसर्गावर प्रेम, पण जबाबदारीने!

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील ही ठिकाणं केवळ फिरायला सुंदर नाहीत, तर मनाला नवसंजीवनी देतात. मात्र, पर्यावरणाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कचरा टाकू नका, स्थानिक नियमांचं पालन करा आणि निसर्गाशी मैत्रीपूर्ण नातं जोपासा.
पावसात भिजत, हिरवळीत हरवून जात, धबधब्यांचा आवाज ऐकत - या ठिकाणी नक्की जा, पण निसर्गाच्या कवेत राहून.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+