साहेबांनी जे कमावलं, ते उद्धवजींनी अडीच वर्षांत गमावलं; राणेंची ठाकरेंसह संजय राऊतांवरही टिका
भाजपच्या महाअधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज शिर्डीत आले. यावेळी पत्रकारांनी राणेंना बोलतं केलं. शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याबाबत पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला. त्यावर राणेंनी आपल्या स्टाईलने उत्तर देत उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.

काय म्हणाले राणे?
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकत्र असणारी महाविकास आघाडी आता फुटली आहे. ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आधी हात वर करुन बोलायचे. मात्र आता हे हात एकदम छोटे झाले आहेत. स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद आता राहिली कुठंय? बाळासाहेबांनी ४६ वर्षांत जे कमावलं होतं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलंय, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.
संजय राऊत डिप्रेशनमध्ये
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री हे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप आज खा. संजय राऊत यांनी केला होता. याबाबत राणे यांना विचारल्यावर ते म्हणाले, संजय राऊत यांची मानसिक स्थिती सध्या चांगली नाही. ते डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही फार लक्ष देऊ नका, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, संजय राऊतांनी आता भाजप हा माफियांना पोसत असल्याचा आरोप केला. शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होते? कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होते? त्यांना जेलमध्ये जाण्याचा पुरस्कार मिळाला होता तेव्हा काय त्यांनी कोणती तीर्थयात्रा केली होती का? मुळात शिवसेनेत आता बोलायलाच माणूस नाही. त्यामुळे कामधंदा नसलेल्या संजय राऊतला बोलायला लावतात, असा टोलाही राणे यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications