Nagpur Violence: नागपूरच्या काही भागात संचारबंदी, पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन! 80 जणांना अटक
Nagpur Violence Update : नागपूरच्या महल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता तेथील परिस्थिती आटोक्यात येत आहे. तणाव निवळत असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. हिंसाचार प्रकरणानंतर नागपूरच्या काही भागात संचारबंदी लावण्यात आली आहे.
दरम्यान हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे नागपूर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून जवळपास 80 जणांना ताब्यात घेतले आहे. ही धरपकड पहाटेपर्यंत सुरु होती.

सोशल मीडियावर व्हिडिओ पसरवणारे टार्गेट
नागपूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांचा सायबर विभाग या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे.
कोणत्या भागात लागली संचारबंदी
पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी नागपुरात 17 मार्चला घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू केली आहे. नागपूर पोलिसांनी काढलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, "भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (1) (2) (3) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक 3 हद्यीतील पोलीस ठाणे कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर या भागास तसेच परिमंडळ 4 मधील सककरदरा, नंदनवन, इमामवाडा या भागात व परिमंडळ 5 मधील यशोधरानगर, कपीलनगर, या परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करीत आहे."
संचारबंदी कालावधीमध्ये कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळून इतर कारणाकरिता घराबाहेर पडणार नाही तसेच 5 पेक्षा जास्त इसम एकत्रीत जमणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारीत करणार नाही. असे सर्व प्रकारचे कृत्य करण्यास मनाई करण्याचे आदेश पारीत करीत आहेत, असेही पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
काय घडले होते नागपुरात?
नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसाचार उसळला होता. यासदंर्भात पोलिस आयुक्तांनी कलम 163 (1)(2)(3)लागू केले आहे. त्यात आपल्या आदेशात म्हटले की, असे निदर्शनास आणुन देण्यात आले आहे की, पोलिस ठाणे गणेशपेठ नागपूर शहर अतंर्गत 17.03.2025 रोजी सकाळी 11.30 वाजता शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दलाने औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन केले होते. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक गट आला आणि त्यांनी गणेशपेठ पोलिस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे पोलिसांवर दगडफेक केली व तणावाचे वातावरण निर्माण केले.












Click it and Unblock the Notifications