नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर? मनपाकडून नोटीस
नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावर आज महागरपालिकेकडून मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्रमुख फहीम खान याच्या नागपुरातील घरावर आता हातोडा चालणार असल्याची माहिती आहे. याबाबत महानगरपालिकेकडून त्याच्या कुटुंबाला एक नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूरच्या यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घर बांधताना अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान याने त्याच्या घराच्या परिसरात 900 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केल्याच्या कारणाने महापालिकेने ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे घरावर बुलडोझर चालवणार असल्याची माहिती मिळत आहे.

नागपूर येथील हिंसाचार प्रकरणात दाखल केलेल्या गुन्हात फहीम खान हा या प्रकरणातील मास्टरमांइड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शहारातील लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज महापालिकेकडून त्याच्या घरावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणातील दोषी आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांच्याकडून नुकसान भरपाईची वसूली केली जाईल. अनाधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावर ही कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर महानगर पालिकेकडून त्याच्या कुटूंबाला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या कुटूंबाकडून हे घर खाली करण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दंगलीबाबत मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात झालेल्या दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असल्याचा देखील निश्चय केला. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्याची भरपाई केली जाईल, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
फडणवीस म्हणाले की, मुळातच काही गोष्टी मी सभागृहातही स्पष्ट केल्यात. त्यानुसार, औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यानंतर कबर जाळताना पवित्र कुराणमधील आयती लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली.
काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर सायंकाळी जमाव जमला. या जमावाने तोडफोड केली, जाळपोळ केली, गाड्या फोडल्या. लोकांवर हल्ले केले. पोलिसांनी 4-5 तासांतच स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची गरज होती त्या सर्व गोष्टींचा वापर पोलिसांनी केला.
या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते. त्याच्यासह खासगी लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केलेले चित्रिकरण व पत्रकारांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 104 लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आली आहे. 12 जण 18 वर्षांखालील असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आलली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications