'त्या' जखमा भुजबळांच्या मनात अजूनही ताज्याच... म्हणाले, लढाई अजून...
आम्ही मराठा समाजाच्या विरोधात कधीच नाहीत. त्यांना हक्काचं मिळालंच पाहीजे. मात्र गेली वर्ष-दीड वर्षे ओबीसी समाज जे अडचणीचे दिवस पाहतोय, ते आता थांबले पाहिजे, असे म्हणत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा ओबीसींचा लढा सुरु करण्याचे सुतोवाच केले. लढाई अजून संपलेली नाही, सगळ्यांनी साथ दिली पाहीजे असे आवाहनही त्यांनी केलं.

नागराज मंजुळे यांना पुरस्कार
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचा 134 वा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला. पुण्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना यंदाचा 'महात्मा फुले समता पुरस्कार' देण्यात आला. त्या कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांच्यावर हल्ला
छगन भुजबळ म्हणाले, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात कधीच नाही. मराठा समाजाच्या हक्काचं त्यांना भेटलंच पाहिजे. आम्ही सत्तेवर असताना त्यांना तीन वेळा आरक्षण दिलं. 10 टक्के ईडब्लूएस आरक्षणही दिलं. आम्ही कायम सर्व समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. मात्र त्यांच्याकडून ओबीसींवर नाहक आरोप करण्यात आले. ओबीसींची घरे जाळण्यात आली. माझ्या निवडणुकीला माझ्या विरोधात प्रचार करायलाही ते आले. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात त्यांनी बैठका घेतल्या. पण ओबीसी समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, असं म्हणत भुजबळ यांनी जरांगे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
ओबीसींची लढाई संपलेली नाही
भुजबळ पुढे म्हणाले की, मी कोणत्याही समाज्याच्या विरोधात नाही. प्रत्येकाला त्यांच्या हक्काच मिळालंच पाहिजे. MPSC करणाऱ्या ओबीसी समाज्यातील विद्यार्थ्यांसाठी आमच्या सरकारने 553 कोटी रुपये दिले. इतर प्रत्येक समाजासाठी सरकारने दिले. ओबीसी सामाज्याच्या लोकांनी छगन भुजबळला मतदान केलं, म्हणून मी निवडून आलो. मात्र आपली लढाई आजून संपली नाही. कदाचित ती पुढेही सुरुच ठेवावी लागेल. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.












Click it and Unblock the Notifications