रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींच्या उपचारांचा खर्चही शासन करणार
Mumbai train accident : दिवा आणि मुंब्रा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघतात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी दिली. तसेच ज्या जखमींवर उपचार सुरु आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च हा शासन करणार असून जखमींना देखील आवश्यकतेप्रमाणे मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान आज सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची त्यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हा अपघात का झाला, कसा झाला, याची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरु आहे.मृत पावलेल्यांची संख्या चार आहे. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत आणि जे जखमी आहेत, त्यांना उपचारानुसार ५० हजार ते दाेन लाखापर्यंतची मदत दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन सर्व जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच रुग्णालय प्रशासनास सर्वोत्तम उपचार व… pic.twitter.com/TTnsQmHCwA
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 9, 2025
तर कळवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर काय उपाय करता येतील याची देखील चर्चा रेल्वे प्रशासनाशी केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कसा झाला लोकलचा अपघात?
1. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारे लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती काही प्रवासी पायदानावर उभे राहून प्रवास करत होते.
2. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन दिशेने जाणारी एक लोकल समोरून आली या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या
3. या भागात दोन रेल्वे रुळांमध्ये अंतर कमी आहे तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या,हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले त्यांच्या बॅगा दुसर्या लोकल वर आदळल्या त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले.
पाचवी आणि सहावी मार्गिका 'सीएसएमटी'पर्यंत लवकर कार्यान्वित करा - श्रीकांत शिंदे
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, या अपघातातील १० जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला आहे. या अपघातात आतापर्यंत चाैघांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications