आझाद मैदान तातडीने रिकामे करा; मुंबई पोलिसांची मनोज जरांगे यांना नोटीस, मराठा आंदोलनाचे काय होणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना तात्काळ शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे आंदोलनाचे भवितव्य अनिश्चित झाले असून, आता जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आणि पोलिसांची कारवाई
उच्च न्यायालयाने आज (२ सप्टेंबर) राज्य सरकारला मुंबईतील मराठा आंदोलकांना दुपारी ४ वाजेपर्यंत बाहेर काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईला छावणीचे स्वरूप आल्यामुळे, न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, आंदोलकांना दक्षिण मुंबईत येऊ देऊ नका, असे सांगितले. आझाद मैदान व्यतिरिक्त सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणाहून आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले होते.
या निर्देशानंतर तत्काळ कारवाई करत आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आंदोलनादरम्यान नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोटिशीत नेमकं काय म्हटलंय?
पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीच्या सदस्यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, मा. मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही आंदोलन करू नये. तसेच, मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून नवी मुंबईतील खारघर येथे आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार करावा.
या नोटिशीत पुढे म्हटले आहे की, आंदोलनासाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती, पण आंदोलकांनी या अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यांनी न्यायालयाच्या आदेशांचेही पालन केले नाही. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी आंदोलनासाठी पुन्हा मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे. पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या काही वक्तव्यांची दखल घेऊन त्यांचा उल्लेखही नोटिशीत केला आहे. त्यामुळे, लवकरात लवकर आझाद मैदान परिसर खाली करावा, असे या नोटिशीत म्हटले आहे.
कोअर कमिटीचा दावा आणि आंदोलनाची सद्यस्थिती
पोलिसांनी नोटीस बजावल्याचा दावा केला असला, तरी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीने अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. या घोषणेनंतर आझाद मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता, आंदोलक आता काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या सर्व घडामोडींमुळे मराठा आंदोलनाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलन सुरू ठेवतात की न्यायालयाचा आणि पोलिसांचा आदेश मान्य करतात, हे आता लवकरच स्पष्ट होईल. या आंदोलनाचा शेवट काय होणार, हा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. सरकार आणि प्रशासन आता पुढील पाऊल उचलण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.












Click it and Unblock the Notifications